YouVersion Logo
Search Icon

1 करिंथ 10

10
इस्राएली लोकांच्या इतिहासावरून इशारा
1बंधुजनहो, आपले पूर्वज मेघाखाली होते आणि तांबड्या समुद्रातून ते सर्व पार गेले, ह्याची आपण आठवण ठेवावी, अशी माझी इच्छा आहे. 2मेघात व समुद्रात मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांना बाप्तिस्मा देण्यात आला. 3त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले 4आणि ते सर्व एकाच प्रकारचे आध्यात्मिक पाणी प्यायले कारण ते त्यांच्याबरोबर जात असलेल्या आध्यात्मिक खडकांतून पीत होते. तो खडक तर स्वतः ख्रिस्त होता. 5तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला.
6ह्या गोष्टी आपल्यासाठी उदाहरणादाखल घडल्या. अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. 7त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. ‘लोक खायला प्यायला बसले, नंतर धुंद होऊन लैंगिक गैरवर्तन करायला उठले’, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे. 8त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले, म्हणून आपण जारकर्म करू नये. 9त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सर्पदंशाने नाश पावले. म्हणून आपण त्यांच्यासारखी प्रभूची परीक्षा पाहू नये. 10त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, म्हणून तशी कुरकुर आपण करू नये.
11ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या व आपल्याला इशारा देण्यासाठी त्या लिहून ठेवण्यात आल्या आहेत कारण आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोहचलो आहोत.
12म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. 13लोकांना सर्वसाधारणपणे ज्या कसोटीतून जावे लागते अशाच प्रकारची कसोटी तुमच्यावर गुदरलेली आहे. देव विश्वसनीय आहे, तो तुमची कसोटी तुमच्या शक्तीपलीकडे पाहणार नाही, तर ती सहन करायला तुम्हांला समर्थ करील व अशा प्रकारे कसोटीबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही दाखवील.
मूर्तिपूजेचा त्याग
14म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. 15तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो, मी काय म्हणतो त्याचा निर्णय तुम्हीच करा. 16जो प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्तामधील सहभाग नाही काय? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीरामधील सहभागिता नाही काय? 17भाकर एक असल्यामुळे, आपण जरी अनेक असलो तरी त्या एका भाकरीत सहभागी झाल्यामुळे, आपण एक शरीर असे आहोत.
18जे जात्याच इस्राएली आहेत त्यांच्याकडे पाहा: यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार असतात ना? 19तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य महत्त्वाचा की, मूर्ती महत्त्वाची? 20तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भुतांना करतात. तुम्ही भुतांचे भागीदार व्हावे अशी माझी इच्छा नाही. 21तुम्ही प्रभूचा प्याला व भुतांचा प्याला पिऊ शकत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भुतांच्या मेजावरचे तुम्ही खाऊ शकत नाही. 22आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय?
23ज्या गोष्टींची मला कायद्याने मुभा दिली आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हिताच्या असतीलच असे नाही. सर्व गोष्टींची मला मुभा आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. 24कोणीही स्वत:चे हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
25बाजारात खाटिक जे काही विकतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने तुम्ही खाऊ शकता; 26कारण पवित्र शास्रात म्हटल्याप्रमाणे, पृथ्वी व तिच्यात जे काही भरले आहे, ते परमेश्वराचे आहे.
27विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतात ते कोणतेही प्रश्न न विचारता सदसद्विवेकबुद्धीने स्वीकारा. 28परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेकबुद्धीखातर तो स्वीकारू नका. 29येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुमची नव्हे तर तुम्हांला आमंत्रण देणाऱ्याची. माझ्या स्वातंत्र्याचा निर्णय दुसऱ्याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा, असे एखादा विचारील. 30मी आभारपूर्वक स्वीकारत असेन, तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याबद्दल माझ्यावर टीका का व्हावी?
31तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता, ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. 32यहुदी, ग्रीक व देवाची ख्रिस्तमंडळी ह्यांच्यापैकी कोणाच्याही मनात संदेह निर्माण करणारे होऊ नका, 33तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in