YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांना 6

6
1मुलांनो, प्रभूमध्ये तुमच्या आईबापांच्या आज्ञेत राहा; कारण हे योग्य आहे. 2-3तुमचे वडील व आई ह्यांचा मान राखा, ह्यासाठी की, तुमचे कल्याण व्हावे व तुम्ही पृथ्वीवर दीर्घायू व्हावे. अभिवचनाने युक्त अशी हीच पहिली आज्ञा आहे.
4बापांनो, आपल्या मुलांना राग येईल अशा प्रकारे वागवू नका, तर त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
5दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत, अशा प्रामाणिक भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत आपल्या जगातील धन्यांचे आज्ञापालन करीत जा. 6केवळ त्यांना खुश करणाऱ्या तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. 7ही सेवा केवळ माणसांची नव्हे तर प्रभूची आहे, असे मानून ती उत्साहाने करा. 8हे लक्षात ठेवा की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तो प्रभूच्या पारितोषिकास पात्र ठरतो.
9मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकावण्याचे सोडून द्या. तुमचा व त्यांचा मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही, या सत्याची आठवण ठेवा.
ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री
10शेवटी, प्रभूवरील निष्ठेत, त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. 11सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची सर्व शस्त्रसामग्री धारण करा; 12कारण आपले युद्ध मानवी शक्तीबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर व अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे. 13तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.
14आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, 15शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा 16आणि जिच्यायोगे त्या दुष्टांचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल नेहमी जवळ बाळगा. 17तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन हाती घ्या. 18परमेश्वराचे साहाय्य मागत ह्या सर्व गोष्टी प्रार्थना करून मागा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ह्याकरिता जागृत राहून चिकाटी बाळगा; सर्व पवित्र जनांसाठी सातत्याने धावा करा. 19जेव्हा मी संदेश देण्यासाठी उभा राहीन, तेव्हा देवाने मला त्याचा संदेश द्यावा म्हणजे धैर्याने मला शुभवर्तमानाचे रहस्य लोकांना कळविता यावे, म्हणून माझ्यासाठीही प्रार्थना करा. 20जरी मी ह्री तुरुंगात असलो, तरी मी शुभवर्तमानाचा राजदूत आहे. मी ज्या प्रकारे शुभवर्तमान घोषित करावयास हवे, त्याप्रकारे ते घोषित करण्यासाठी मला धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करा.
समारोप
21माझे कसे काय चालले आहे, हे तुम्हांला समजावे म्हणून आपला प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक तुखिक तुम्हांला सर्व काही कळवील. 22आमची खुशाली तुम्हांला कळावी व तुम्हांला उत्तेजन मिळावे ह्याकरिता मी त्याला तुमच्याकडे पाठविले आहे.
23देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्याकडून आपल्या ख्रिस्ती बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. 24आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अमर प्रीती करतात, त्या सर्वांवर देवाची कृपा राहो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in