YouVersion Logo
Search Icon

यहूदा 1

1
नमस्कार
1देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाखाली असलेले व देवाने आमंत्रित केलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा सेवक व याकोबचा बंधू यहूदा ह्याच्याकडून:
2दया, शांती व प्रीती ही तुम्हांला विपुल मिळोत.
खोटे शिक्षक व नैतिक अधःपात ह्यांबाबत सूचना
3प्रियजनहो, आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हांला लिहिण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीत असताना तुम्हांला श्रद्धेच्या लढाईत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता लिहिण्याची मला आवश्यकता वाटली. ही श्रद्धा देवाने निर्णायक स्वरूपात पवित्र जनांच्या हवाली केली आहे. 4कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.
5प्रभूने इजिप्त देशातून आपल्या लोकांना मुक्त केले परंतु नंतर जे विश्वासहीन झाले, त्यांचा त्याने नाश केला, हे तुम्हांला ठाऊक आहेच. तरीही मी तुम्हांला त्याची आठवण करून देऊ इच्छितो. 6ज्या देवदूतांनी आपल्या अधिकारपदाची मर्यादा न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतराच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे. 7सदोम, गमोरा आणि सभोवतालची नगरे येथील लोक त्या देवदूतांसारखे वागले आणि त्यांनी विकृत, अनैतिक, लैंगिक वर्तन केले. सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली ही नगरे स्पष्ट इशारा म्हणून सर्वांच्या पुढे ठेवली आहेत.
8हे दृष्टान्त पाहणारे लोक स्वतःचे शरीर अशुद्ध करतात, अधिकाराचा अव्हेर करतात आणि उच्च स्थानी असलेल्या गौरवशाली थोरांचा उपमर्द करतात. 9आद्य देवदूत मीखाएलदेखील असा वागला नाही. जेव्हा त्याने मोशेच्या शरीराविषयी सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याचा उपमर्द करण्यास तो धजला नाही, तर ‘प्रभू तुझी कानउघाडणी करो’, एवढेच तो म्हणाला. 10तथापि ज्या गोष्टी ह्यांना समजत नाहीत, त्यांची हे अवहेलना करतात आणि ज्या गोष्टी रानटी पशूंप्रमाणे ह्यांना सहज प्रवृत्तीने समजतात त्यांच्यायोगे हे आपला नाश करून घेतात. 11त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला. 12ते तुमच्याबरोबर निर्लज्ज मद्यपानोत्सव करतात, तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात घाणेरड्या स्थळांसारखे आहेत, ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात. ते वाऱ्याने वाहून नेलेल्या निर्जल मेघांसारखे, हेमंत ऋतूतील फलहीन, पूर्णपणे मेलेल्या व समूळ उपटलेल्या झाडांसारखे आहेत. 13हे लोक समुद्राच्या विक्राळ लाटांसारखे आहेत. त्यांची लज्जास्पद कृत्ये लाटांच्या फेसाप्रमाणे वर आलेली दिसतात. ते भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत. त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.
14आदामपासून सहावा वंशज हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला की, 15पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि अधार्मिक लोकांनी अभक्तीने केलेल्या सर्व दुष्ट कृत्यांवरून आणि जे सर्व भयंकर शब्द अधार्मिक पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितले त्यावरून, त्या सर्वांस दोषी ठरवावयास प्रभू आपल्या हजारो पवित्र देवदूतांसह येईल.
16हे लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत, तोंडाने ते फुशारकी मारतात व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.
17परंतु प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा. 18ते तुम्हांला असे सांगत असत की, शेवटच्या काळी आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. 19ती फूट पाडणारी, देहवासनांनी प्रभावित, ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नाही, अशी आहेत. 20प्रियजनहो, तुम्ही मात्र आपल्या परमपवित्र श्रद्धेवर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, 21शाश्वत जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा आणि आपल्याला देवाच्या प्रीतीमध्ये राखा.
22जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, 23इतरांना अग्नीतून ओढून काढा व त्यांचे तारण करा आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र पापवासनेने डागाळलेली त्यांची वस्त्रे तुच्छ माना.
24तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या वैभवशाली सान्निध्यात निर्दोष असे उ्रासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, 25त्या आपल्या उद्धारक अशा एकमेव देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे वैभव, ऐश्वर्य, सामर्थ्य व अधिकार ही युगारंभापूर्वी, आत्ता व युगानुयुगे असोत! आमेन.

Currently Selected:

यहूदा 1: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in