YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 13

13
समुद्रातून वर आलेले श्वापद
1नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले, त्याला दहा शिंगे व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. 2जे श्वापद मी पाहिले, ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व विपुल अधिकार दिला. 3त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याची प्राणघातक जखम बरी झाली होती. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य व्यक्त करत त्या श्वापदामागून गेली. 4अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून सर्वांनी अजगराची आराधना केली, त्यांनी श्वापदाची आराधना करताना म्हटले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?”
5देवनिंदा करणारे अहंकारयुक्त दावे करण्याची त्याला मुभा देण्यात आली होती आणि बेचाळीस महिने त्याला अधिकार देण्यात आला होता. 6त्याने देवनिंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास सुरुवात केली. 7पवित्र लोकांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. सर्व वंश, लोक, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला. 8जगाच्या स्थापनेपासून ज्या कोणाची नावे वधलेल्या कोकराजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, त्यांना सोडून पृथ्वीवर राहणारे इतर सर्व जण त्या श्वापदाची आराधना करतील.
9ज्या कोणाला कान आहेत, त्याने ऐकावे. 10कैदेत नेणारा कैदेत जातो, जो तलवारीने ठार मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे म्हणून पवित्र लोकांना धीर व विश्वास मिळतो.
भूमीतून वर आलेले श्वापद
11नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकराच्या शिंगांसारखी दोन शिंगे होती, ते अजगरासारखे बोलत होते. 12ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालविते आणि ज्या पहिल्या श्वापदाची प्राणघातक जखम बरी झाली होती, त्याची पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी आराधना करावी, असे ते दडपण आणते. 13ह्या दुसऱ्या श्वापदाने मोठेमोठे चमत्कार केले. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील त्याने केले. 14जी चिन्हे त्या पहिल्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून त्याने पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवले, म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदाची मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना त्याने फसवले. 15पहिल्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली होती, ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीची आराधना करणार नाहीत ते ठार मारले जावेत, असे तिने घडवून आणावे. 16लहानथोर, गरीब व श्रीमंत, स्वतंत्र व दास ह्या सर्वानी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी 17आणि ज्याच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे दडपण त्याने सर्व लोकांवर आणले.
18येथे सुज्ञतेचे काम आहे, ज्याला समज आहे, त्याने श्वापदाच्या संख्येचा अर्थ शोधून काढावा कारण संख्या माणसाच्या नावाचा बोध करते. त्याची संख्या सहाशे सहासष्ट आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in