YouVersion Logo
Search Icon

1 करिंथकरांस 12

12
आध्यात्मिक दानांसंदर्भात
1आता, बंधूंनो आणि भगिनींनो, आत्मिक दानांसंदर्भात तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. 2तुम्हाला आठवतच असेल की तुम्ही गैरयहूदी होता, तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारे का होईना मुक्या मूर्तींच्या प्रभावाखाली भटकले गेला होता. 3याच कारणासाठी तुम्हाला हे समजावे की परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा कोणीही “येशू शापित असो” असे म्हणणार नाही आणि कोणी मनुष्य पवित्र आत्म्याशिवाय, “येशू प्रभू आहे” असेही म्हणणार नाही.
4निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे. 5सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे. 6कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.
7आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते. 8एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्‍याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो. 9त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्‍याला रोग बरे करण्याची दाने मिळतात. 10तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो. 11ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.
एक शरीर, अनेक अवयव
12जसे शरीर एक असून, अनेक अवयव आहेत, तरी हे सर्व अवयव मिळून एकच शरीर होते, तसेच ख्रिस्ताविषयीही आहे. 13काही यहूदी किंवा गैरयहूदी, काही गुलाम किंवा स्वतंत्र, आपण सर्व एकाच आत्म्याद्वारे एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा पावलेलो आहोत आणि आपल्या प्रत्येकाला एक आत्मा प्यावयास दिला आहे. 14आता शरीर एकच अवयव नाही, तर ते अनेक अवयवांनी मिळून बनलेले आहे.
15समजा पाय म्हणाला, “मी हात नाही म्हणून शरीराचा अवयव नाही,” तरी त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. 16तसेच कानाने म्हटले, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही,” तर त्याच्या त्या म्हणण्यामुळे तो शरीराचा भाग होत नाही असे नाही. 17सर्व शरीर केवळ डोळा असते, तर ऐकावयास कसे आले असते? किंवा जर संपूर्ण शरीर केवळ कानच असते, तर वास कसा घेता आला असता? 18परंतु परमेश्वराने आपल्या योजनेप्रमाणे सर्व अवयवांना एकाच शरीरामध्ये त्याला पाहिजे तशी रचना केली आहे. 19ते केवळ एकच भाग असते, तर शरीर कुठे असते? 20तर मग अनेक अवयव आहेत, परंतु शरीर मात्र एकच आहे.
21डोळा हातास म्हणू शकत नाही, “मला तुझी गरज नाही.” तसेच मस्तकही पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.” 22उलट शरीराचे अशक्त म्हणून समजले जाणारे अवयवही अत्यावश्यक आहेत. 23आपल्याला वाटते की शरीरामध्ये काही भाग कमी मानाचे आहेत तरी त्यांना आपण विशेष सन्मानाने वागवितो आणि तुच्छ गणले गेलेल्या अवयवांना सुरूप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. 24सुरूप दिसणार्‍या अवयवांची अशी काळजी घेण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वराने आपल्या शरीराचे निरनिराळे भाग अशा रीतीने जोडले आहेत की जे भाग एरवी कमी महत्त्वाचे वाटतात, त्यांचा मोठा सन्मान केला जावा. 25ते अशासाठी की शरीरामध्ये फूट नसावी, तर सर्व अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. 26जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात.
27आता आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि आपण प्रत्येकजण त्याचे भाग आहोत, 28आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे. 29सर्व प्रेषित आहे काय? सर्व संदेष्टे आहेत काय? सर्व शिक्षक आहेत काय? प्रत्येकाला चमत्कार करण्याचे दान मिळाले आहे काय? 30सर्वांना रोग बरे करण्याची दाने मिळाली आहेत काय? सर्वजणांना अन्य भाषेत बोलतात काय? सर्वजण स्पष्टीकरण करतात काय? 31तेव्हा अधिक उच्चदानांची इच्छा बाळगणे चांगले.
प्रीती अनिवार्य आहे
आणि आता मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्ग दाखवितो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in