15
ख्रिस्ताचे पुनरुत्थान
1आता माझ्या बंधूंनो व भगिनींनो, ज्या शुभवार्तेचा मी तुम्हाला प्रचार केला होता, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, तिचा तुम्ही स्वीकार केला आणि तिच्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभे आहात. 2या शुभवार्तेद्वारे तुमचे तारण झाले, ज्या वचनांचा मी तुम्हाला प्रचार केला त्यावर जर तुम्ही दृढविश्वास ठेवला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
3प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले. 4त्यांना पुरण्यात आले आणि तीन दिवसानंतर त्यांना शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे कबरेतून पुन्हा उठविण्यात आले, 5आणि केफाला त्यांचे पहिल्यांदा दर्शन घडले, आणि नंतर बारा शिष्यांना. 6त्यानंतर पाचशेपेक्षा अधिक बंधू व भगिनींना एकाच वेळी त्यांचे दर्शन घडले, त्यातील बहुतेक आजही जिवंत असले, तरी काहीजण मरण पावले आहेत. 7याकोबाला आणि नंतर सर्व प्रेषितांना त्यांचे दर्शन झाले. 8सर्वात शेवटी, एखाद्या अवेळी जन्मलेल्यासारखे मला त्यांचे दर्शन झाले.
9कारण सर्व प्रेषितांपेक्षा मी सर्वात कनिष्ठ आहे आणि प्रेषित म्हणून घेण्याच्या किंचितही लायकीचा नाही, कारण मी परमेश्वराच्या मंडळीचा छळ केला. 10आता मी जो काही आहे, तो परमेश्वराच्या कृपेमुळेच आहे; आणि त्यांची माझ्यावरील कृपा व्यर्थ गेली नाही. कारण इतर सर्वांपेक्षा मी अधिक कष्ट केले; परंतु मी नाही तर परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्यामुळे हे झाले. 11प्रचार मी किंवा त्यांनी केला, परंतु संदेश तोच आहे आणि त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
मृतांचे पुनरुत्थान
12परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात? 13जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही. 14आणि ख्रिस्त अजून उठविले गेले नाही, तर आमचा प्रचार आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे. 15यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही परमेश्वराविषयी खोटी साक्ष देणारे आढळलो, कारण परमेश्वराने ख्रिस्ताला मृतांतून उठविले अशी साक्ष आम्ही देतो. मृत झालेले पुन्हा उठविले जाणार नाहीत, तर त्यांनी त्याला मृतांतून उठविलेच नाही. 16जर मेलेले जिवंत होत नाही, तर मग ख्रिस्तही अजून जिवंत झालेले नाही; 17आणि ख्रिस्त मरणातून जिवंत झाले नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तुम्ही अजूनही तुमच्या पापातच आहात. 18आणि तर जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत, त्यांचाही नाश झाला आहे. 19जर ख्रिस्तामध्ये आपली आशा फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठी असेल, तर सर्व मनुष्यांमध्ये आपली स्थिती अधिक दयनीय ठरेल.
20परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे. 21कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. 22कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील 23प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील. 24नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील. 25कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. 26शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल. 27कारण त्यांनी “सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या आहेत.”#15:27 स्तोत्र 8:6 आता जेव्हा असे म्हटले आहे की, “सर्वकाही” त्यांच्या अधिकाराखाली ठेवले आहे, यावरून स्पष्ट होते की ज्यांनी “सर्वकाही” ख्रिस्ताच्या अधीन केले आहे आणि त्या सर्वकाहीमध्ये परमेश्वराचा समावेश नाही. 28हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे.
29जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे? 30आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे? 31निश्चित, मी दररोज मृत्यूला तोंड देतो. मला ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. 32जर पृथ्वीवरील आशेने इफिस येथील हिंस्र पशूंशी मनुष्यांसारखे लढण्यात आले तर मला काय लाभ झाला? जर मेलेले पुन्हा जिवंत होणार नाही तर,
“चला, आपण खाऊ आणि पिऊ,
कारण उद्या आपण मरणार आहोत.”#15:32 यश 22:23
33तुम्ही फसविले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.”#15:33 मिनांदर नावाच्या ग्रीक कवी पासून 34तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो.
पुनरुत्थित शरीर
35आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?” 36किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही. 37तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्या कशाचे तरी असते. 38मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात. 39सर्व देह एकसारखे नसतात: मानवाचा देह एकप्रकारचा, पशूंचा दुसर्या प्रकारचा, पक्षांचा एक आणि मत्स्याचा एक. 40त्याचप्रमाणे स्वर्गीय शरीरे आणि दैहिक शरीरेही आहेत. परंतु स्वर्गीय शरीराचे सौंदर्य एका प्रकारचे आणि भौतिक शरीराचे सौंदर्य दुसर्या प्रकारचे आहे. 41सूर्याला एका विशिष्ट प्रकारचे तेज असते, चंद्राला दुसर्या प्रकारचे आणि तार्यांना वेगळ्या प्रकारचे तेज आहे. शिवाय सर्व तार्यांचेही तेज वेगवेगळे असते.
42अशाप्रकारे ज्यांचे मरणातून पुनरुत्थान झाले त्यांचे होईल. नाशवंत असे शरीर पेरले जाते, अविनाशी असे उठविले जाते. 43अपमानात पेरले जाते पण गौरवात उठविले जाते आणि अशक्तपणात पेरले जाते पण शक्तीत उठविले जाते. 44नैसर्गिक शरीर पेरले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते.
जर नैसर्गिक शरीर आहे तर आत्मिक शरीरही आहे. 45असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.”#15:45 उत्प 2:7 शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे. 46प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे. 47पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता. 48जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत. 49आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.
50माझ्या बंधू व भगिनींनो मी तुम्हाला जाहीर करतो की रक्त व मांस यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे नाशवंताला अविनाशी वतन मिळू शकत नाही. 51ऐका, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो: आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. 52हे सर्व क्षणार्धात, डोळ्याची उघडझाप होते न होते तोच, शेवटचे रणशिंग वाजल्याबरोबर घडून येईल. कारण तुतारीचा नाद होईल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठविले जातील, आणि आपण बदलले जाऊ. 53कारण नाशवंताने अविनाशीपणाला धारण केले पाहिजे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केलेच पाहिजे. 54जेव्हा जे नाशवंत आहे ते अविनाशीपण परिधान करेल, आणि जे मर्त्य आहे ते अमरत्व, तेव्हा हे शास्त्रलेखातील वचन सत्य होईल: “विजयाने मृत्यूला गिळून टाकले आहे.”#15:54 यश 25:8
55“अरे मरणा, तुझा विजय कुठे?
अरे मरणा, तुझी नांगी कुठे?”#15:55 होशे 13:14
56कारण मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. 57परंतु आपण परमेश्वराचे आभार मानू, कारण तेच आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतात.
58यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.