4
सांप्रत दुर्बलता आणि पुनरुत्थित जीवन
1यास्तव, परमेश्वराच्या दयेने आम्हालाही सेवा प्राप्त झाली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही. 2आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो. 3जरी आमची शुभवार्ता आच्छादिलेली असली, तर ती ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यापासूनच आच्छादिलेली आहे. 4या जगाच्या अधिपतीने विश्वासणार्यांची मने आंधळी केली आहेत, म्हणून शुभवार्तेचा प्रकाश जो ख्रिस्ताचे गौरव आणि परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो, ते पाहू शकत नाहीत. 5आम्ही स्वतःविषयी प्रचार करीत नाही, तर ख्रिस्त येशू हेच प्रभू आणि आम्ही येशूंसाठी तुमचे दास आहोत. 6कारण, “अंधकारातून प्रकाश हो,”#4:6 उत्प 1:3 असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात दिला आहे.
7तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे. 8आम्ही चहूकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. 9छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही. 10आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे. 11म्हणून आम्ही, जे जिवंत आहोत ते येशूंप्रीत्यर्थ मरणासाठी सोपवून दिलेले आहोत, यासाठी की आमच्या मर्त्य देहांमध्ये सुद्धा त्यांचे जीवन प्रकट व्हावे. 12आमच्यामध्ये मृत्यू कार्य करतो, परंतु तुम्हामध्ये जीवन कार्य करते.
13असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला आहे म्हणून मी बोललो,”#4:13 स्तोत्र 116:10 त्याप्रमाणे आमच्याजवळ सारखाच विश्वासाचा आत्मा#4:13 किंवा आत्म्याद्वारे दिलेले आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो आणि बोलतो. 14आम्हाला हे माहीत आहे की, ज्यांनी प्रभू येशूंना मेलेल्यांमधून जिवंत केले, तेच आम्हालाही येशूंबरोबर पुन्हा जिवंत करतील आणि तुमच्याबरोबरच आम्हाला स्वतःपुढे सादर करतील. 15हे सर्व तुमच्या भल्यासाठी आहे, जितके अधिक लोक त्यांच्या कृपेने त्यांच्याजवळ येतील, तितके त्यांच्या अपार दयेबद्दल त्यांचे आभार मानतील आणि परमेश्वराचे अधिक गौरव होईल.
16यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही. 18म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे.