8
प्रभूच्या लोकांसाठी वर्गणी
1आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. 2अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली. 3त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो. 4प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली. 5आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले. 6म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे. 7तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.
8याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे. 9आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
10या गोष्टीसंबंधाने जे तुमच्यासाठी योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो: मागील वर्षी तुम्हीच असे होता की ज्यांनी प्रथम देण्यास आरंभ केला. इतकेच केवळ नव्हे, परंतु तशी इच्छाही बाळगण्यामध्ये तुम्ही पुढे होता. 11मग एवढ्या इच्छेच्या उत्साहाने आरंभ केलेले हे कार्य ते समाप्त होईपर्यंत तुमच्याजवळ जे असेल ते देऊन पूर्ण करा. 12जर देण्याची तुमची खरोखर इच्छा असेल, तर जे तुमच्याकडे आहे, त्या आधारावर तुमचे दान स्वीकारले जाईल, जे तुमच्याजवळ नाही त्याप्रमाणे नाही.
13आमची अशी इच्छा नाही की तुम्ही अधिक दबून जावे म्हणजे इतरांचा भार हलका व्हावा परंतु समानता असावी असे आम्हाला वाटते. 14या वेळेला सध्या तुमच्या विपुलतेतून ज्याकाही त्यांच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील, पुढे त्यांच्या विपुलतेतून ज्या तुमच्या गरजा आहेत त्या भागविल्या जातील. आमचे ध्येय समानता असावी असे आहे. 15याबाबतीत शास्त्रलेख काय म्हणतो: “ज्याने खूप गोळा केले, त्याला अधिक झाले नाही, आणि ज्याने थोडे गोळा केले त्याला थोडे झाले नाही.”#8:15 निर्ग 16:18
वर्गणी गोळा करण्यास तीताची रवानगी
16जशी मला तुमच्याविषयी कळकळ आहे तशीच तीताच्या हृदयात परमेश्वराने उत्पन्न केली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. 17त्याने आमची विनंती आनंदाने मान्य केली इतकेच केवळ नव्हे तर तो फारच उत्साहाने व स्वतःच्या इच्छेने आपणास भेटावयास येत आहे. 18शुभवार्तेच्या सेवेसाठी ज्याची प्रशंसा सर्व मंडळ्यातून होत आहे अशा एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवित आहे. 19खरे म्हणजे, आम्ही कृपेचे दान घेऊन येत असताना आमच्याबरोबर प्रवास करण्यासाठी या बंधुची मंडळ्यांमधून निवड झाली होती. यामुळे केवळ प्रभूचे गौरव होईल व साहाय्य करण्याविषयीची आमची मदत करण्याची आस्था सर्वांना दिसून येईल. 20कारण ही उदारतेने साहाय्यता म्हणून दिलेली देणगी आम्ही कशी हाताळतो याबाबतीत कोणालाही टीका करण्याचा प्रसंग मिळू नये, म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत. 21फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.
22मी तुमच्याकडे आणखी एका बंधूला पाठवित आहे. तो पुष्कळ प्रकारे आस्थेवाईक असल्याचे आम्हाला अनुभवाने माहीत आहे, कारण त्याचा तुमच्यावर अधिक भरवसा आहे. 23तीत तुमच्यामध्ये माझा भागीदार व सहायक आहे आणि त्याच्याबरोबर जे बंधू आहेत, ते येथील मंडळ्यांचे प्रतिनिधी आणि ख्रिस्ताचे गौरव आहेत. 24कृपा करून ती प्रीती या बंधुंवरही करा आणि तुम्ही ते सर्व त्यांच्यासाठी कराल असे मी अभिमानाने व जाहीरपणे म्हटले आहे. ते सर्व मंडळ्यांनी पाहावे.