YouVersion Logo
Search Icon

2 तीमथ्य 2

2
आव्हानाचे नूतनीकरण
1माझ्या मुला, ख्रिस्त येशूंच्या ठायी जी कृपा आहे, तिच्यात सबळ हो. 2ज्यागोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांच्या समोर माझ्याकडून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांच्या स्वाधीन कर. जे इतरांनाही शिकविण्यास समर्थ आहेत. 3येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, 4कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे. 5एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही. 6परिश्रम करणार्‍या शेतकर्‍याने पिकाचा पहिला वाटा घेणे योग्य आहे. 7जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो.
8येशू ख्रिस्त, जे दावीदाचे वंशज, मृतांतून उठविले गेले याची आठवण ठेव, हीच माझी शुभवार्ता. 9या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही. 10परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना माझ्या दुःखसहनाकडून ख्रिस्त येशूंमध्ये तारण आणि सार्वकालिक गौरव मिळणार असेल, तर मी ती दुःखे आनंदाने सोशीन.
11ही बाब विश्वासयोग्य आहे की
त्यांच्याबरोबर आपण मेलो तर
त्यांच्याबरोबर जिवंतही राहू.
12जर आपण धीराने दुःख सहन करतो तर
त्यांच्याबरोबर राज्यही करू,
जर आपण त्यांना नाकारतो तर
तेही आपल्याला नाकारतील.
13जर आपण अविश्वासी झालो,
तरी ते विश्वासू राहतात,
कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.
खोट्या शिक्षकांशी व्यवहार
14परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्‍यांचा नाश होतो. 15तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर. 16भक्तिहीन वादविवाद टाळा, कारण जे त्यात गुंततात ते अधिकाधिक भक्तिहीन होतील. 17आणि याप्रकारचे शिक्षण कुजलेल्या जखमेसारखे पसरेल. हुमनाय व फिलेत, ती दोघे अशा प्रकारची माणसे आहेत. 18त्यांनी सत्याचा मार्ग सोडला आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे, अशी घोषणा करीत अनेकांचा विश्वास नष्ट केला आहे. 19परंतु परमेश्वराने घातलेला पाया स्थिर आहे, त्यास शिक्का हा आहे: “जे प्रभूचे#2:19 मूळ भाषेत याहवेह आहेत, त्यांना ते ओळखतात,” आणि “प्रभूचे नाव घेणार्‍यांनी अधर्मापासून दूर राहावे.”
20मोठ्या घरात सोन्याचांदीची, तशीच काही लाकडाची व मातीची बनविलेली पात्रे असतात. काही विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी आहेत. 21म्हणूनच, जो स्वतःला त्यापासून दूर राहून शुद्ध करतो, तो सन्मानास नेमलेले, पवित्र, स्वामीसाठी उपयुक्त आणि प्रत्येक चांगल्या कार्यासाठी तयार केलेले पात्र मानला जाईल.
22तारुण्यातील वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात त्यांच्यासोबत नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्यामागे लाग. 23परंतु मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वादात गुंतला जाऊ नकोस, कारण त्याद्वारे भांडणे होतात हे तुला ठाऊक आहे. 24प्रभूचे सेवक भांडखोर नसावेत, तर जे अयोग्य गोष्टी करतात, त्यांचे ते सौम्य, सहनशील असे शिक्षक असावेत. 25विरोध करणार्‍यांना नम्रतेने शिकविण्याचा प्रयत्न कर, कदाचित परमेश्वर त्यांना सत्याच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी पश्चात्ताप देईल. 26सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी कैद करून ठेवले आहे. ते शुद्धीवर येतील आणि सैतानाच्या सापळ्यातून सुटतील.

Currently Selected:

2 तीमथ्य 2: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in