17
थेस्सलनीका येथे पौल
1जेव्हा पौल व त्याचे सहकारी प्रवास करीत अंफिपुली व अपल्लोनिया या शहरांमधून जात होते तेव्हा ते थेस्सलनीका येथे आले, ज्या ठिकाणी यहूद्यांचे सभागृह होते. 2आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, 3त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, “या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत.” 4ऐकणार्यांपैकी काही यहूदीयांची खात्री झाली आणि ती माणसे पौल व सीला यांना येऊन मिळाली. यामध्ये परमेश्वराचे भय धरणार्या ग्रीक लोकांची संख्या मोठी होती आणि त्यात काही प्रमुख स्त्रियाही समाविष्ट होत्या.
5परंतु इतर यहूदीयांना मत्सर वाटला; म्हणून त्यांनी रस्त्यावरील काही गुंड लोकांना घेऊन शहरात त्यांना दंगल करण्यास चिथावणी दिली. पौल व सीला यांना बाहेर काढून लोकांकडे#17:5 किंवा लोकांच्या जमावाकडे आणण्यासाठी ते त्यांना शोधीत यासोनाच्या घराकडे धावले. 6पण ते तिथे नाहीत, असे पाहून त्यांनी यासोन व इतर काही विश्वासणार्यांना ओढून काढले व त्यांना शहर न्यायाधीशांपुढे नेऊन आरडाओरड करून म्हणाले, “या माणसांनी सर्व जगात उलथापालथ केली आहे आणि आता ते येथेही आलेले आहेत; 7आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.” 8शहरातील अधिकारी व लोकसमुदाय यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांची धांदल उडाली. 9मग यासोन व इतरांकडून जामीन घेतल्यानंतरच त्यांना जाऊ दिले.
बिरुया
10रात्र झाल्याबरोबर विश्वासणार्यांनी पौल व सीला यांना बिरुयास पाठविले. तिथे पोहोचल्यावर ते यहूदी सभागृहामध्ये गेले. 11आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत. 12याचा परिणाम असा झाला की अनेकांनी विश्वास ठेवला, यामध्ये बर्याच संख्येने प्रमुख ग्रीक स्त्रिया व अनेक ग्रीक पुरुष देखील होते.
13थेस्सलनीकातील यहूद्यांनी पौल बिरुया येथे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करीत आहे असे ऐकले, तेव्हा काहीजण तिथे गेले आणि त्यांनी तिथेही समुदायामध्ये चळवळ व खळबळ उडवून दिली. 14विश्वासणार्यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले. 15पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.
ॲथेन्समध्ये पौल
16त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला. 17म्हणून तो सभागृहामध्ये यहूदी आणि परमेश्वराचे भय धरणारे गैरयहूदी या दोघांबरोबर चर्चा करण्यासाठी जाऊ लागला आणि दररोज सार्वजनिक चौकात जे येत होते त्या सर्वांशी वादविवाद करू लागला. 18तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता. 19नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर चर्चेसाठी बैठकीत आणले व ते त्याला म्हणाले, “तू हे जे नवीन शिक्षण देत आहेस, ते काय आहे, हे आम्हाला समजेल का? 20कारण तू आम्हाला अपरिचित असलेल्या गोष्टी ऐकवीत आहेस व त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.” 21सर्व ॲथेन्सचे नागरिक व तिथे राहणारे परदेशी लोक, इतर काहीही न करता नव्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे यामध्ये आपला वेळ घालवित असत.
22पौल अरीयपगाच्या बैठकीमध्ये मध्यभागी उभा राहून म्हणाला: “ॲथेन्सच्या नागरिकांनो! आपण सर्व दृष्टीने अतिशय धार्मिक वृत्तीचे आहात, ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. 23कारण मी बाहेर फिरत असताना, तुमच्या पूजेच्या वस्तूंकडे मी काळजीपूर्वक पाहिले, मला एक वेदीसुद्धा दिसून आली जिच्यावर असा शिलालेख होता:
अज्ञात परमेश्वराला.
म्हणजे ज्या परमेश्वराला तुम्ही ओळखत नाही त्याची तुम्ही उपासना करता आणि आता त्यांच्याविषयीच मी तुम्हाला सांगत आहे.
24“ज्या परमेश्वराने जग व त्यातील सर्वकाही निर्माण केले ते आकाशाचे व पृथ्वीचे प्रभू आहेत, म्हणून ते हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाहीत; 25मानवी हात त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, कारण त्यांना कशाचीही गरज नाही. ते प्रत्येकाला जीव आणि श्वास व लागणारे सर्वकाही पुरवितात. 26त्यांनी एका मनुष्यापासून सर्व राष्ट्रे उत्पन्न केली, त्यांनी सर्व पृथ्वीवर निवास करावा असे केले आणि इतिहासामध्ये त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या निवासांच्या निश्चित सीमा त्यांनी आधी नेमल्या होत्या. 27परमेश्वराने हे यासाठी केले की, लोक त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत. 28‘कारण त्यांच्यामध्ये आपण जगतो, वागतो आणि आपले अस्तित्व आहे.’ प्रत्यक्ष तुमच्या कवींपैकी काहींनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपण त्यांची संतती आहोत.’
29“यास्तव जर आपण परमेश्वराची संतती आहोत, तर मग आपण असा विचार कधीही करू नये की परमेश्वर म्हणजे मानवाच्या कलाकृतीने व कौशल्याने, सोने किंवा चांदी या धातूपासून अथवा दगडापासून तयार केलेल्या प्रतिमेसारखा आहे. 30पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे. 31कारण त्यांनी असा एक दिवस ठरविला आहे, त्या दिवशी ते त्यांनी नियुक्त केलेल्या मनुष्याच्या द्वारे या जगाचा न्याय नीतीने करतील. त्यांना त्यांनी मरणातून जिवंत करून या गोष्टींबाबत प्रत्येकाला खात्री करून दिली आहे.”
32मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.” 33त्यामुळे, पौल त्यांना सोडून निघून गेला. 34काही लोक पौलाचे अनुयायी झाले व त्यांनी विश्वास ठेवला. त्यात दिओनुस्य नावाचा अरीयपगाचा एक सभासद, दामारी नावाची एक स्त्री व इतर काहीजण होते.