YouVersion Logo
Search Icon

प्रेषित 27

27
पौलाचा रोमकडे जलप्रवास
1आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले. 2तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्‍यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्‍या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता.
3दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील. 4तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो. 5आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्‍याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो. 6तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले. 7मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले. 8पुढे वादळी वार्‍यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्‍याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो.
9बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस#27:9 किंवा योम किप्पूर होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्‍यांना इशारा दिला, 10तो म्हणाला, “माणसांनो, आपला हा जलप्रवास भीषण आहे कदाचित आपले तारू फुटेल, मालाची हानी होईल आणि आपले जीवसुद्धा धोक्यात येतील.” 11परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला. 12कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तिथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेता या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते.
समुद्रातील वादळ
13जेव्हा दक्षिणी वारा मंद गतीने वाहू लागला, तेव्हा त्यांना वाटले की आता योग्य संधी आहे; म्हणून त्यांनी नांगर उचलला आणि क्रेताच्या काठाकाठाने ते प्रवास करू लागले. 14ते फारसे दूर गेलेही नव्हते तोच, युरकुलोन नावाचा ईशान्येकडील तुफानी वारा बेटावरून अतिशय झपाट्याने वाहू लागला. 15या वादळामध्ये तारू सापडले आणि वारा नेईल तिकडे तारू वाहत जाऊ लागले. आम्हीही तारू वार्‍याबरोबर वाहू दिले. 16आम्ही कौदा नावाच्या एका लहान बेटाजवळून जात असताना, मोठ्या प्रयासाने जीवनरक्षक होडी तारवाला बांधू शकलो, 17मग ती होडीवर घेतल्यानंतर, तारवाचा खालील भाग मजबूत करण्यासाठी दोरांनी आवळून बांधले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की तारू सुर्तीच्या किनार्‍यावर जाऊन वाळूत रुतून बसेल. म्हणून त्यांनी जहाजाचे शीड उतरविले आणि जहाजाला वाहवत जाऊ दिले. 18दुसर्‍या दिवशी समुद्र अधिकच खवळला. तेव्हा तारू हलके करण्यासाठी खलाशी तारवातील माल समुद्रात टाकू लागले. 19तिसर्‍या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली. 20त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली.
21अनेक दिवस कोणी काहीही खाल्ले नव्हते, मग शेवटी पौल उभा राहून त्यांना म्हणाला: “माणसांनो, तुम्ही माझा सल्ला ऐकून क्रेता बंदर सोडले नसते, तर हे नुकसान व हानी टळू शकली असती. 22तरी मी तुम्हाला विनंती करतो आता धैर्य सोडण्याची गरज नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही; फक्त जहाजाचेच नुकसान होईल. 23जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला 24आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्‍या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’ 25यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार. 26परंतु आपले जहाज एका बेटावर आदळून फुटणार आहे.”
तारू फुटते
27चौदाव्या रात्रीस अद्रिया#27:27 जुन्या काळात या भागाचा उल्लेख दक्षिण इटली मध्ये समाविष्ट होता सागराच्या लाटांनी हैराण होऊन हेलकावे खात असताना, मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांना वाटले की आपण एका जमिनीजवळ येत आहोत. 28त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली. 29आपले तारू खडकावर आपटेल असे भय वाटल्यामुळे, त्यांनी तारवाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करू लागले. 30काही खलाश्यांनी होडी सोडून पळून जाण्याचा बेत केला. नाळीवरून म्हणजे जहाजाच्या पुढच्या बाजूने नांगर टाकीत आहोत, असा बहाणा करून त्यांनी होडी खाली सोडली. 31परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.” 32तेव्हा सैनिकांनी होडीचे दोर कापून ती जाईल तिकडे वाहू दिली.
33पहाट होण्यापूर्वी पौलाने प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, “आज चौदा दिवसापासून, अनिश्चित अशा मनःस्थितीत तुम्ही उपाशी राहिला आहात, काहीही खाल्ले नाही. 34आता मी विनंती करतो की थोडेतरी खा म्हणजे तुमचा बचाव होईल कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही.” 35हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली. 36ते सर्व उत्तेजित झाले व त्यांनी खाण्यास सुरुवात केली. 37जहाजात आम्ही सर्वजण मिळून दोनशे शहात्तर लोक होतो. 38त्यांनी जेवढे पाहिजे तेवढे खाल्यानंतर, खलाश्यांनी जहाजातील धान्य समुद्रात टाकले व जहाज आणखी हलके केले.
39दिवस उजाडला, तरी त्यांना किनारा ओळखता आला नाही, परंतु एक खाडी व तिचा सपाट किनारा, त्यांच्या दृष्टीस पडला व मचव्याने किनार्‍यावर जाण्याचा त्यांनी निश्चय केला व जलयान तिथेच ठेवले. 40सरतेशेवटी जेव्हा तसा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले, तेव्हा त्यांनी नांगर कापून टाकून, ते समुद्रात राहू दिले सुकाणूची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्‍यावर सोडून किनार्‍याची वाट धरली. 41परंतु जहाज पुढे जाऊन वाळूत रुतून बसले. नाळ घट्ट रुतली आणि वरामाचे म्हणजे जहाजाच्या मागील भागाचे आदळणार्‍या लाटांनी तुकडे तुकडे झाले.
42तेव्हा कैदी पोहत जाऊन पळून जाऊ नयेत म्हणून सर्व कैद्यांना ठार मारावे, अशी योजना सैनिकांनी केली. 43परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे. 44त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in