प्रेषित 28
28
मलता येथे पौल
1किनार्यावर सुरक्षित पोहोचल्यावर, आम्हाला समजले की त्या बेटाचे नाव मलता असे होते. 2त्या बेटावरील लोकांनी आम्हाला असाधारण दया दाखविली. त्यांनी आमच्यासाठी शेकोटी पेटवून आमचे स्वागत केले कारण पाऊस असून थंडी पडली होती. 3तेव्हा पौलाने काटक्या आणून शेकोटीवर ठेवल्या, इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक विषारी साप बाहेर निघाला व पौलाच्या हाताला विळखा घालून राहिला. 4त्या बेटावरील लोकांनी त्या सर्पाला त्याच्या हाताला झोंबलेले पाहिले, तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “हा मनुष्य खात्रीने खुनी असला पाहिजे; तो जरी समुद्रातून वाचला, तरी न्याय देवी त्याला जगू देणार नाही.” 5परंतु पौलाने तो साप झटकून अग्नीत टाकला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. 6आता पौल सुजेल किंवा तत्काळ मरून पडेल अशी लोकांची अपेक्षा होती; परंतु पुष्कळ वेळ वाट पाहिल्यानंतर, काही विशेष झाले नाही हे दिसल्यावर, त्यांनी आपले मन बदलले आणि तो परमेश्वर असावा असे म्हणाले.
7जवळच त्या बेटाच्या पुबल्य नावाच्या मुख्याधिकाऱ्याची मालमत्ता होती. त्याने त्याच्या घरी आमचे स्वागत केले आणि तीन दिवस आदरातिथ्य केले. 8त्याचे वडील बिछान्यावर तापाने व जुलाबाने आजारी होते. पौल त्याला पाहावयास गेला आणि प्रार्थना केल्यानंतर त्याचे हात त्याच्यावर ठेऊन त्याला बरे केले. 9हे घडून आल्यावर, बेटावरील इतर आजारी माणसे त्याच्याकडे आली आणि बरी होऊन गेली. 10अनेक प्रकारे त्यांनी आमचा सन्मान केला आणि जेव्हा आम्ही समुद्रप्रवासाला निघण्यास तयार झालो, त्यांनी आम्हाला लागणार्या सर्व आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला.
रोमचा प्रवास पुढे सुरू
11तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. त्यावर त्याची निशाणी क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती. 12सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो. 13तिथून आम्ही निघालो आणि रेगियमला पोहोचलो. दुसर्या दिवशी दक्षिणेकडील वारा वाहू लागल्यावर, तिथून आम्ही निघालो व एका दिवसाच्या प्रवासानंतर पुत्युलास जाऊन पोहोचलो. 14तिथे आम्हाला काही विश्वासी आढळले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक आठवडाभर राहण्याची विनंती केली. मग आम्ही रोमला आलो. 15तेथील बंधुजनांनी आम्ही येणार असे ऐकले आणि ते प्रवास करून अप्पियाची पेठ व तीन उतार शाळा या ठिकाणी आम्हाला येऊन भेटले. त्यांना पाहून पौलाने परमेश्वराचे आभार मानले आणि त्याला प्रोत्साहन प्राप्त झाले. 16पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे.
पौल रोम येथे पहार्यात उपदेश करतो
17तीन दिवसानंतर पौलाने स्थानिक यहूदी पुढार्यांना एकत्र बोलाविले. ते आल्यावर तो म्हणाला: “माझ्या बंधूंनो, मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा आपल्या पूर्वजांच्या रूढींचे उल्लंघन केलेले नाही, तरी यरुशलेममध्ये मला बंदिवान करून रोमी सरकारच्या हवाली केले. 18रोमी लोकांनी माझी तपासणी केली आणि मला सोडून देण्याची त्यांची इच्छा होती, कारण मरणदंडास पात्र असा गुन्हा मी केलेला नव्हता. 19परंतु यहूद्यांनी माझ्या सुटकेला विरोध केल्यामुळे, कैसराजवळ न्याय मागण्याशिवाय मला दुसरा पर्यायच राहिला नाही. मला खरोखरच माझ्या लोकांविरुद्ध आरोप करावयाचे नव्हते 20या कारणामुळे मी तुम्हाला आज येथे येण्याची विनंती केली की आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी व आपल्याबरोबर बोलावे. कारण मी इस्राएलाच्या आशेमुळे या साखळीने बांधलेला आहे.”
21तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तुमच्यासंबंधात आम्हाला यहूदीयातून पत्रेही आली नाहीत आणि तिथून आलेल्या आमच्या बांधवांकडून काही अहवाल कळविण्यात आला नाही 22परंतु आम्हाला तुमचे विचार ऐकायला हवे आहेत, कारण या पंथाच्या विरुद्ध सर्वत्र लोक बोलत आहेत.”
23तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला. 24ऐकणार्यांपैकी काहींनी खात्रीपूर्वक विश्वास ठेवला, परंतु काहींनी ठेवला नाही. 25त्यांचे एकमेकात एकमत होत नव्हते व पौलाचे शेवटचे निवेदन ऐकल्यावर ते उठून जाऊ लागले: पवित्र आत्म्याद्वारे यशायाह संदेष्ट्याने तुमच्या पूर्वजांना सत्य सांगितले ते असे:
26“ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.
27या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा;
त्यांचे कान मंद
आणि त्यांचे डोळे बंद करा.
नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील,
त्यांच्या कानांनी ऐकतील,
अंतःकरणापासून समजतील,
आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’#28:27 यश 6:9, 10
28“म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” 29हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी तीव्रपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले.#28:29 हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही
30पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्यांचे तो स्वागत करीत असे. 31त्याने मोठ्या धैर्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे शिक्षण दिले!
Currently Selected:
प्रेषित 28: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.