3
ख्रिस्तामध्ये जिवंत असलेल्यांसारखे जगणे
1यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा. 2तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. 3कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे. 4ख्रिस्त जे आपले#3:4 किंवा तुमचे जीवन आहेत, ते प्रकट होतील, तेव्हा तुम्हीही त्यांच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.
5म्हणून आपल्यातील ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे. 6यामुळे परमेश्वराचा क्रोध येणार आहे. 7पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता. 8परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा. 9एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे. 10तुम्ही आता नवा मनुष्य धारण केला आहे, जो आपल्या उत्पन्न करणार्याच्या प्रतिमेमध्ये, ज्ञानामध्ये नवा होत आहे. 11यामध्ये गैरयहूदी किंवा यहूदी, सुंती किंवा असुंती, बर्बर व स्कुथी, गुलाम किंवा स्वतंत्र असा फरक नाही, परंतु ख्रिस्तच सर्व आणि सर्वात आहेत.
12यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा. 13एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. 14आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
15ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा. 16स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. 17आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
ख्रिस्ती कुटुंबाकरिता नियम
18पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.
19पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी कठोरतेने वागू नका.
20लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.
21वडिलांनो,#3:21 किंवा आईवडिलांनो तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.
22दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा. 23जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा. 24हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात. 25अन्याय करणार्यास त्याच्या अन्यायाचे प्रतिफळ मिळेल, पक्षपात होणार नाही.