YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 21

21
न उलगडलेल्या हत्येबद्दल नियम
1याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही, 2तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे. 3नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी 4आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्‍यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी. 5यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे. 6मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील, 7आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही. 8हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल, 9आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.
कैद करून आणलेल्या स्त्रीशी विवाह
10जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूंना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांना तुम्ही बंदिवान कराल, 11आणि त्या बंदिवानात तुम्हाला जर एखादी देखणी तरुणी आढळली आणि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झालात तर तिचा तुम्ही तुमची पत्नी म्हणून स्वीकार करावा. 12तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत 13आणि तिने बंदिवासाची सर्व वस्त्रे बाजूला ठेवून द्यावीत आणि नंतर तिने तुमच्या घरी तिच्या आईवडिलांसाठी संपूर्ण महिनाभर शोक करावा. त्यानंतर तुम्ही तिच्याशी संबंध ठेऊ शकता, तुम्ही तिचे पती व ती तुमची पत्नी होईल. 14जर तुम्हाला ती आवडेनाशी झाली, तर तिला मुक्त करावे व तिला हवे तिथे जाऊ द्यावे, तुम्ही तिला किंमत घेऊन विकू नये, अथवा तिला गुलामासारखे वागवू नये कारण तुम्ही तिची अवहेलना केली आहे.
ज्येष्ठ पुत्राचा हक्क
15एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल, 16तर जेव्हा तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा जो खरा ज्येष्ठपुत्र असून नावडत्या पत्नीचा पुत्र आहे, त्याला डावलून, धाकट्या पुत्राला, जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे, त्याला आपल्या प्रथम पुत्राचा अधिकार देऊ नये. 17आपल्या परंपरेप्रमाणे त्याने आपल्या सर्वात ज्येष्ठ पुत्राला दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. तो जरी नावडत्या पत्नीचा पुत्र असला, तरीही ज्येष्ठ पुत्राचा हक्क त्याचाच आहे.
बंडखोर पुत्र
18जर एखाद्या मनुष्याला हट्टी व बंडखोर पुत्र असेल, जो आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळत नसेल आणि त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांचे ऐकत नसेल, 19तर त्याच्या आईवडिलांनी त्याला धरून नगराच्या वेशीवर वडील मंडळीपुढे घेऊन जावे. 20त्यांनी वडील मंडळीपुढे सांगावे, “हा आमचा पुत्र हट्टी आणि बंडखोर आहे. तो आमच्या आज्ञा पाळत नसून आमचे ऐकत नाही. तो खादाड व मद्यपी आहे.” 21मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.
निरनिराळे नियम
22जर एखाद्या मनुष्याने असा काही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला ज्याची शिक्षा मृत्युदंड आहे व त्याला मृत्युदंड देण्यात आला आणि त्याला झाडावर टांगण्यात आले असेल, 23तर त्याचा मृतदेह रात्रभर तिथे ठेवू नये, तर त्याच दिवशी त्याचे दफन करावे; कारण जो कोणी खांबावर टांगलेला असेल, त्याच्यावर परमेश्वराचा शाप असतो. म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जो देश वतन म्हणून देत आहे, तो तुम्ही भ्रष्ट करू नये.

Currently Selected:

अनुवाद 21: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in