YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस 2

2
ख्रिस्तामध्ये जिवंत केलेले
1तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता. 2त्यामध्ये तुम्ही जगाच्या रितीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्‍यांमध्ये कार्य करीत आहे, त्‍याच्यामागे चालणारे होता. 3एकेकाळी आपणही त्यामध्ये जगत होतो. आपल्यामधील दैहिक वासना आणि विचार यांचे अनुसरण करणार्‍यांप्रमाणेच नैसर्गिकरित्या परमेश्वराच्या क्रोधास पात्र होतो. 4परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतिमुळे, 5आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. 6आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसवले आहे. 7यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्‍या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. 8कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, 9कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. 10कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.
यहूदी आणि गैरयहूदीयांचा ख्रिस्तात समेट
11यास्तव, आठवण ठेवा की जे आपण पूर्वी जन्माने गैरयहूदी व सुंता झालेल्याकडून असुंती समजले जात होतो, ती सुंता शरीरात मनुष्यांच्या हाताने केली जात असे. 12लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता. 13जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे.
14-15कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधिसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी. 16कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला. 17तुम्ही जे त्यांच्यापासून फार दूर होते आणि जे जवळ होते, अशा दोघांसाठी ते आले व त्यांनी शांतीचा प्रचार केला. 18कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे.
19या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. 20तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत. 21त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभुचे पवित्र मंदिर होत आहे. 22त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वस्तीस्थान झाला आहात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in