YouVersion Logo
Search Icon

यशायाह 32

32
नीतिमत्वाचे राज्य
1पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल
आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.
2प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान
आणि वादळापासून आश्रयस्थान,
वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा
आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.
3तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत,
आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील.
4भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील
आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल.
5यापुढे मूर्खांना चांगले
व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही.
6मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात,
त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते:
ते देवहीनतेची कृत्ये करतात
आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात;
भुकेल्यांना ते उपाशी सोडतात
आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.
7बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात,
गरजवंताची याचना वाजवी असली तरी,
ते दुष्टाईच्या योजना बनवितात,
ते लबाडीने गरिबांचा नाश करतात.
8परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो
आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो.
यरुशलेमच्या स्त्रिया
9आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो,
उठा व माझे ऐका;
हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो,
मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!
10एका वर्षाहून अधिक कालावधीत
तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील;
कारण द्राक्षाचा उपज बुडेल,
आणि फळांचा हंगाम येणार नाही.
11आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा;
निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या!
आपली सुंदर वस्त्रे काढून
शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.
12तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी,
फलवंत द्राक्षवेलीसाठी
13आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही
कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील—
होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी,
व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा.
14गडाचा त्याग करण्यात येईल,
गजबजलेली शहरे रिकामी होतील;
किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील,
जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,
15परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल,
ओसाड भूमी सुपीक होईल,
आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल.
16याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल,
व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.
17शांती नीतिमत्तेचे फळ असेल;
नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.
18माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली
आणि सुरक्षित असतील,
त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.
19जरी गारांनी अरण्याचा नाश होईल
आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.
20तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल,
प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल,
आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.

Currently Selected:

यशायाह 32: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in