YouVersion Logo
Search Icon

यशायाह 37

37
यरुशलेमच्या सुटकेचे भविष्य
1जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला. 2त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले. 3ते त्याला म्हणाले, “हिज्कीयाह असे म्हणतो: आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमानाचा दिवस आहे, कारण लेकरे होण्याची वेळ आली परंतु ते प्रसवण्याची शक्ती नाही. 4कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”
5जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले, 6यशायाह त्यांना म्हणाला, “तुमच्या धन्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: तुम्ही जे ऐकले आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका—त्या शब्दांनी अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी माझी निंदा केली आहे. 7ऐका! जेव्हा तो एक ठराविक अहवाल ऐकेल, तेव्हा मी त्याला त्याच्या स्वतःच्या देशात परत जाण्याची इच्छा व्हावी असे करेन आणि तिथे तो तलवारीने वधला जाईल असे मी करेन.’ ”
8जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.
9आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्यास निघाला आहे. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले: 10“यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणत असताना तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका. 11अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा नाश कसा केला, हे तुम्ही ऐकलेच आहे. मग तुमची सुटका होईल काय? 12माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय? 13हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?”
हिज्कीयाहची प्रार्थना
14हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले. 15आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: 16“अहो सर्वसमर्थ याहवेह इस्राएलांचे परमेश्वरा, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे. 17हे याहवेह, आपले कान लावा आणि ऐका; याहवेह, आपले डोळे उघडा आणि पाहा; आणि जिवंत परमेश्वराचा उपहास करण्यास पाठविलेले सन्हेरीबचे सर्व शब्द ऐका.
18“हे याहवेह, हे खरे आहे की अश्शूरच्या राजांनी या सर्व लोकांचा आणि त्यांच्या भूमीचा नाश केला आहे. 19आणि त्यांनी त्यांची दैवते अग्नीत फेकून दिली आहेत, कारण त्या मूर्ती परमेश्वर नव्हत्या. ते तर मनुष्याने घडविलेले लाकूड आणि दगड होते. 20आता हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, त्याच्या तावडीतून आम्हाला सोडव, म्हणजे याहवेह केवळ तुम्हीच परमेश्वर आहात, हे पृथ्वीवरील सर्व राज्यांना कळेल.”
सन्हेरीबचे पतन
21मग आमोजाचा पुत्र यशायाह याने हिज्कीयाह राजाला हा संदेश पाठविला: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात: कारण तू अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्याविषयी माझ्याकडे प्रार्थना केली, 22त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे:
“सीयोनाची कुमारी कन्या
तुझा उपहास आणि तिरस्कार करते.
यरुशलेम कन्या
तुझे पलायन बघून आपले डोके हालविते.
23तू कोणाचा उपहास व निंदा केलीस?
तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास,
गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस?
इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस!
24तुझे दूत पाठवून
तू प्रभूची चेष्टा केली.
आणि तू म्हणतोस,
‘मी माझ्या अनेक रथांनी
उंचच उंच पर्वतावर चढून गेलो,
लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो.
मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले,
निवडक गंधसरू तोडले.
मी तिच्या दुर्गम उंचीवर पोहोचलो
तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो.
25अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या
आणि तेथील पाणी प्यालो.
माझ्या पावलाच्या तळव्याने
मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’
26“हे तू ऐकले नव्हते काय?
याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता.
या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या;
आता मी त्या अंमलात आणल्या आहेत,
जी तटबंदीची शहरे तू
उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास.
27त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली,
ते निराश व लज्जित झालेले आहेत.
ते शेतातील पिकासारखे,
कोवळी पाने आलेल्या रोपासारखे,
छतावर उगविलेल्या गवतासारखे,
पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते.
28“परंतु मी जाणतो तू कुठे आहेस
तू कधी जातो व येतो
आणि तू माझ्यावर कसा संतापतोस.
29कारण तू माझ्यावर संतापतो
व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे,
मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन
व तुझ्या तोंडात लगाम घालेन
आणि मग तू आलास त्याच वाटेने
तुझ्याच देशात तुला परत नेईन.
30“हिज्कीयाह, तुझ्यासाठी चिन्ह असेल:
“या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल,
तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल.
परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल,
द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल.
31पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक
जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल.
32यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील,
सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल.
सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने
हे सर्व घडून येईल.
33“म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात:
“तो या शहरात प्रवेश करणार नाही
किंवा एखादा बाणही सोडणार नाही.
तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही
किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही.
34ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल;
तो या शहरात प्रवेश करणार नाही,”
असे याहवेह घोषित करतात.
35“माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीद याच्या स्मरणार्थ,
मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!”
36त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तो त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती. 37म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला.
38एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस, त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.

Currently Selected:

यशायाह 37: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in