YouVersion Logo
Search Icon

यशायाह 45

45
1“त्यांच्या अभिषिक्ताला दिलेला याहवेहचा संदेश,
कोरेशने अनेक देश जिंकावे
आणि राजांना शस्त्र विरहित करावे यासाठी
मी त्याचा उजवा हात धरला आहे.
मी त्याच्यासाठी दारे उघडेन;
यापुढे या वेशी बंद होणार नाहीत:
2हे सायरसा, मी तुझ्यापुढे चालेन,
मी पर्वत जमीनदोस्त करेन
आणि कास्याच्या वेशी तोडेन
व त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकेन.
3दडवून ठेवलेली भांडारे,
गुप्तस्थळी जमा करून ठेवलेली संपत्ती, मी तुला देईन,
जेणेकरून तुला तुझ्या नावाने हाक मारणारा,
इस्राएलचा परमेश्वर याहवेह मीच आहे हे तुला समजेल.
4माझा सेवक याकोबासाठी,
माझ्या निवडलेल्या इस्राएलसाठी,
तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही,
तरी मी तुला नावाने हाक मारून बोलाविले
आणि तुला मानाच्या उपाधीने अलंकृत केले.
5मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;
माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही परमेश्वर नाही.
तू जरी माझा अधिकार मान्य करत नाही,
तरी मी तुला सामर्थ्य देईन.
6मग सूर्योदयापासून
ते सूर्यास्तापर्यंत
सर्व लोकांना कळेल की माझ्याशिवाय दुसरा परमेश्वर नाहीच.
मीच याहवेह आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही;
7मीच प्रकाश व अंधकार निर्माण करतो.
मीच कल्याण व अरिष्ट आणतो,
या सर्व गोष्टी करणारा याहवेह मीच आहे.
8“अहो वरील आकाशांनो, माझ्या नीतिमत्तेचा पाऊस पडू द्या;
मेघ त्याचा वर्षाव करोत,
पृथ्वी पूर्ण रुंदीने उघडून जावो,
तारण उसळून वर येवो
त्यासह नीतिमत्वाचीही भरभराट होवो;
मी, याहवेहने हे निर्माण केले आहे.
9“जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो, त्याला धिक्कार असो.
जो जमिनीवर पडलेल्या अनेक मडक्याच्या तुकड्यांमधील
केवळ एक मडक्याच्या तुकडा आहे.
माती कुंभाराला म्हणते काय,
‘हे तू काय घडवित आहेस?’
तुझी हस्तकृती तुला म्हणते काय,
‘कुंभाराला तर हातच नाहीत’?
10धिक्कार असो त्या मुलाला, जो त्याच्या पित्याला म्हणतो
‘तुम्ही कोणाला जन्म दिलात?’
किंवा त्याच्या आईला विचारतो,
‘तू कोणाला जन्मास घातले?’
11“इस्राएलचे पवित्र परमेश्वर आणि तिचे निर्माणकर्ता,
याहवेह हे असे म्हणतात:
जे पुढे घडणार आहे त्याविषयी,
माझ्या लेकरांबद्धल तुम्ही मला प्रश्न विचारता काय,
किंवा माझ्या हस्तकृतीसाठी मला आज्ञा देता काय?
12ज्याने पृथ्वी अस्तित्वात आणली
व तिच्यावर मानवजात निर्माण केली, तो मीच आहे.
माझ्या हातांनी मी अंतराळ पसरले
त्यांच्या तारकागण माझ्याच आज्ञेत आहेत.
13माझा न्याय्य हेतू सिद्धीस नेण्यास मीच सायरसला उभारेन:
त्याचे सर्व मार्ग मी सरळ करेन.
तो माझे शहर पुनर्निर्मित करेल,
माझे बंदिवान लोक मोकळे करेल,
पण ते तो बक्षीस किंवा मोबदल्यासाठी करणार नाही,
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.”
14याहवेह असे म्हणतात:
“इजिप्तचे उत्पादन आणि कूशचा सर्व व्यापारी माल
व शबाईचे ते उंच लोक—
ते तुमच्याकडे येतील
ते सर्वकाही तुमचेच होईल.
बेड्या घातलेल्या बंदिवानाप्रमाणे ते पाय ओढत तुमच्यामागे चालतील
ते साखळदंडाने बांधलेले तुमच्याकडे येतील.
तुम्हाला नमन करतील
व विनंती करून म्हणतील,
‘निश्चितच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, दुसरे कोणी नाही;
त्यांच्याशिवाय दुसरा देव नाही.’ ”
15हे परमेश्वरा आणि इस्राएलाच्या तारणकर्त्या,
खरोखर तुम्ही परमेश्वर आहात, जे स्वतःला अदृश्य ठेवतात.
16जे मूर्ती घडवितात, ते लज्जित व अपमानित होतील;
ते सर्वजण एकत्र अपमानित केले जातील.
17परंतु अनंतकाळच्या तारणाने
याहवेह इस्राएलला सोडवतील;
युगानुयुगापर्यंत ते कधीही
लज्जित व अपमानित होणार नाहीत.
18याहवेह असे म्हणतात—
ज्यांनी आकाशे निर्माण केली
तेच परमेश्वर आहेत;
ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली व घडण केली,
ती प्रस्थापित केली;
ती ओसाड व निर्जन घडविली नाही,
परंतु त्यावर वसतिस्थान व्हावे म्हणून निर्माण केली—
ते म्हणतात:
“मीच याहवेह आहे.
माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.
19मी गुप्तपणे,
एखाद्या अंधार्‍या ठिकाणाहून बोललो नाही;
मी याकोबाच्या वंशजांना असे म्हटले नाही,
‘माझा व्यर्थच शोध घ्या.’
मी, याहवेह, जे सत्य तेच बोलतो;
जे योग्य आहे तेच घोषित करतो.
20“हे देशातून पलायन करणाऱ्यांनो, एकत्र या,
जमा होऊन एकत्र या;
लाकडी मूर्ती घेऊन फिरणारे अज्ञानी लोक,
ते अशा दैवतांची प्रार्थना करतात, जे त्यांची सोडवणूक करू शकत नाहीत.
21पुढे काय होणार आहे ते विचारार्थ हजर करा—
आपसात विचारविनिमय करा.
पुरातन कालातच हे सर्व भविष्य कोणी सांगितले,
अत्यंत जुन्या काळी हे कोणी घोषित केले?
तो मीच, याहवेह नव्हतो काय?
कारण मजवेगळा दुसरा परमेश्वरच नाही,
न्यायी परमेश्वर व उद्धारकर्ता
माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही.
22“पृथ्वीच्या सर्व टोकांनो,
माझ्याकडे वळा व उद्धार पावा;
कारण मीच परमेश्वर आहे, अन्य कोणीही नाही.
23मी स्वतः शपथ वाहिली आहे,
माझ्या मुखाने संपूर्ण प्रामाणिकपणाने हे शब्द उच्चारले आहेत
ते हे शब्द आहेत, जे कधीही रद्द केले जाणार नाहीतः
प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल;
आणि प्रत्येक जीभ माझ्या नावाने शपथ घेईल.
24ते माझ्याबद्दल म्हणतील,
‘केवळ याहवेहमध्येच आमची सुटका व सामर्थ्य आहे.’ ”
जेव्हा त्यांच्यावर संतापलेले सर्वजण
त्यांच्याकडे येतील, तेव्हा ते लज्जित होतील.
25इस्राएलचे सर्व वंशज
याहवेहमध्ये सुटका पावतील
आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतील.

Currently Selected:

यशायाह 45: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in