5
जुलूम करणार्या श्रीमंतांना इशारा
1श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा. 2तुमची संपत्ती सडली आहे व तुमच्या वस्त्रांना गंज लागला आहे. 3तुमचे सोने आणि चांदी याला गंज चढला आहे. त्यांचे गंजणे तुम्हाविरुद्ध साक्ष देईल आणि अग्निप्रमाणे तुमचे मांस खाऊन टाकील. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धनाचा साठा करून ठेवला आहे. 4पाहा! ज्या कामकर्यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभुच्या कानावर गेला आहे. 5पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी धष्टपुष्ट केले आहे. 6तुम्ही निष्पाप माणसाला जो तुमचा विरोध करत नव्हता त्याला दोषी ठरवून त्याचा वध केला.
दुःखसहनात सोशिकपणा
7प्रिय बंधुनो आणि भगिनींनो, प्रभुचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्या पावसाची धीराने वाट पाहतो. 8तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीर उभे राहा, कारण प्रभुचे येणे जवळ आले आहे. 9बंधुंनो आणि भगिनींनो, तुमचा न्याय होऊ नये म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. न्यायाधीश दारात उभा आहे.
10बंधुनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभुच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या. 11तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादीत म्हणतो. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभुने त्याला कसे आशीर्वादीत केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेला आहे.
12या सर्वांपेक्षा, माझ्या बंधू आणि भगिनींनो, न स्वर्गाची किंवा पृथ्वीची किंवा दुसर्या कोणत्याच गोष्टींची शपथ वाहू नका. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे “होय” किंवा “नाही” असावे. नाही तर तुम्ही दोषी ठरविले जाल.
विश्वासाची प्रार्थना
13तुम्हापैकी कोणी त्रासात आहे का? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे का? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत. 14तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभुच्या नावाने तेल लावावे आणि प्रार्थना करावी. 15विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करील; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल. 16यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
17एलीया अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही. 18मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला, आणि पृथ्वीने आपला उपज दिला.
19प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, जर तुम्हातील कोणी एक सत्यापासून बहकला असेल आणि अशा व्यक्तीला कोणी परत आणेल तर, 20हे लक्षात ठेवा जो कोणी अशा पापी व्यक्तीला त्यांच्या अयोग्य मार्गापासून फिरवतो तो त्यांना मरणापासून वाचवेल आणि त्यांच्या अनेक पापांवर पांघरूण घालेल.