YouVersion Logo
Search Icon

योहान 21

21
येशू आणि मासे धरण्याचा चमत्कार
1त्यानंतर येशू पुन्हा तिबिर्‍यास सरोवराजवळ शिष्यांस प्रगट झाले, ते असे घडले: 2शिमोन पेत्र, दिदुम म्हणून ओळखला जाणारा थोमा, गालीलातील काना येथील नाथानाएल, जब्दीचे पुत्र आणि दुसरे दोन शिष्य एकत्रित होते. 3शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयास बाहेर जात आहे,” तेव्हा ते पेत्राला म्हणाले, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते बाहेर निघून होडीत बसले, परंतु त्या रात्री ते काहीही धरू शकले नाही.
4पहाटेच्या वेळी, येशू सरोवराच्या काठावर उभे होते, परंतु ते येशू आहेत हे शिष्यांना समजले नाही.
5येशूंनी हाक मारून विचारले, “मित्रांनो, तुमच्याजवळ काही मासे आहेत काय?”
“नाही,” त्यांनी उत्तर दिले.
6मग त्यांनी म्हटले, “होडीच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला काही सापडतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने मासे मिळाले की त्यांना जाळे ओढणे अशक्य झाले.
7मग ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “ते प्रभू आहेत!” शिमोन पेत्राने, “ते प्रभू आहेत,” हे ऐकताच आपला अंगरखा कंबरेभोवती गुंडाळला, कारण त्याने तो काढून ठेवला होता आणि पाण्यात उडी मारली. 8दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते काठापासून दूर नव्हते, तर सुमारे नव्वद मीटर अंतरावर होते. 9मग काठावर उतरल्यावर, त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला, त्यावर मासळी व काही भाकरी ठेवल्या होत्या.
10येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही आणा.” 11शिमोन पेत्राने परत मचव्यावर चढून जाळे काठावर ओढून आणले. त्याने मोजल्याप्रमाणे त्यात एकशे त्रेपन्न मोठे मासे होते आणि इतके असूनही ते जाळे फाटले नव्हते. 12येशू त्यांना म्हणाले, “या आणि न्याहरी करा.” आपण कोण आहात? असे विचारण्याचे त्यांच्या शिष्यांपैकी एकालाही धैर्य झाले नाही, परंतु ते प्रभू आहे हे त्यांना माहीत होते. 13मग येशू आले, त्यांनी भाकर घेऊन त्यांना दिली व मासळीचेही त्यांनी तसेच केले. 14मेलेल्यातून उठल्यावर शिष्यांना प्रगट होण्याची येशूंची ही तिसरी वेळ होती.
येशू पेत्राची पुनर्स्थापना करतात
15जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?”
तेव्हा पेत्राने उत्तर दिले, “होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे.”
येशूंनी त्याला म्हटले, “तर माझ्या कोकरांना चार.”
16येशूंनी पुन्हा विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?”
पेत्र म्हणाला, “होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.”
येशू त्याला म्हणाले, “माझ्या मेंढरांना पाळ.”
17तिसर्‍या वेळेला त्यांनी त्याला विचारले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?”
“तू माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला “प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो.”
येशू म्हणाले, “माझ्या मेंढरांस चार. 18मी तुला निश्चित सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा पोशाख चढवून तुला हवे तिथे जात होतास; परंतु तू जेव्हा वृद्ध होशील, तेव्हा तू आपले हात पसरशील आणि मग दुसरे तुला पोशाख घालतील आणि तुला जिथे जावयास नको तिथे नेतील.” 19परमेश्वराचे गौरव करण्यासाठी पेत्र कोणत्या प्रकारच्या मरणाने मरेल, हे त्याला कळावे, म्हणून येशू असे बोलले. मग येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये!”
20मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो त्यांच्यामागे येत होता असे त्याने पाहिले. भोजनाच्या वेळी येशूंच्या उराशी असता मागे वळून, “प्रभूजी, आपला घात कोण करणार आहे?” असे ज्याने विचारले होते तो हा शिष्य होता. 21पेत्राने त्याला पाहिल्यावर येशूंना विचारले, “प्रभूजी, याचे काय?”
22त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी पुन्हा येईपर्यंत त्याने जगावे, अशी माझी इच्छा असली तर त्याचे तुला काय? तुला माझ्यामागे आलेच पाहिजे.” 23या कारणाने, तो शिष्य मरणार नाही अशी अफवा विश्वासणार्‍यांमध्ये पसरली. परंतु तो मरणार नाही, असे ते म्हणाले नव्हते; येशू ख्रिस्त एवढेच म्हणाले होते, “मी येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असली, तर त्याचे तुला काय?”
24तो हा शिष्य ज्याने या सर्व गोष्टींविषयी साक्ष दिली आणि त्या लिहून ठेवल्या. त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे.
25येशूंनी दुसरीही बहुत कृत्ये केलीत. मला वाटते, जर सर्व घटना लिहून काढल्या, तर इतकी पुस्तके होतील की ती या संपूर्ण जगात मावणार नाहीत.

Currently Selected:

योहान 21: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in