YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 9

9
गिबोनी लोकांनी केलेली फसवणूक
1यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्‍यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले 2तेव्हा ते एकमताने यहोशुआ आणि इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र आले.
3तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले, 4तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले. 5त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्‍यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या. 6ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”
7तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?”
8ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.”
परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?”
9त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे. 10त्याचप्रमाणे तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील अमोर्‍यांच्या दोन राजांचे—हेशबोनचा राजा सीहोन व अष्टारोथातील बाशानचा राजा ओगचे काय केले त्यासंबंधी देखील ऐकले आहे. 11म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’ 12आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे. 13हे द्राक्षारसाचे बुधले अगदी नवीन होते, परंतु आता ते जुने झालेले आहेत व त्यांना भेगा पडलेल्या आहेत. आमचे कपडे व आमचे जोडे लांबच्या खडतर प्रवासाने जीर्ण झालेले आहेत.”
14इस्राएली लोकांनी त्यांच्या अन्नसामुग्रींचा नमुना पाहिला, परंतु त्यांनी याबाबतीत याहवेहला विचारले नाही. 15नंतर यहोशुआने त्यांनी जगावे यासाठी त्यांच्याबरोबर शांतीचा करार केला आणि मंडळीच्या पुढार्‍यांनी शपथेच्याद्वारे या गोष्टीला संमती दिली.
16त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते. 17तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्‍या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे. 18परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्‍यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती.
संपूर्ण सभेने पुढार्‍यांविरुद्ध कुरकुर केली, 19परंतु सर्व पुढार्‍यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही. 20आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.” 21ते पुढे म्हणाले, “त्यांना जगू द्या, परंतु त्यांनी संपूर्ण मंडळीच्या सेवेसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी वाहणारे म्हणून राहावे.” अशाप्रकारे पुढार्‍यांनी त्यांना दिलेल्या वचनाचे पालन केले.
22नंतर यहोशुआने गिबोनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, “आम्ही दूरच्या देशात राहतो असे सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली? खरे पाहिले तर तुम्ही आमच्या जवळच राहता. 23तुमच्यावर आता शाप आला आहे: तुम्हाला आता माझ्या परमेश्वराच्या घरासाठी लाकडे तोडणारे आणि पाणी वाहणारे या सेवेतून कधीही सोडविले जाणार नाही.”
24तेव्हा त्यांनी यहोशुआला उत्तर दिले, “कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी आपला सेवक मोशेला हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेण्याची आणि त्यात राहणार्‍या सर्व लोकांना नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जिवाबद्दल भीती वाटू लागली; म्हणूनच आम्ही हे केले. 25आता आम्ही सर्वस्वी तुमच्या हाती आहोत. तुम्हाला चांगले व योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचे करा.”
26तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही. 27यहोशुआने त्या दिवशी इस्राएली लोकांच्या सभेकरिता आणि याहवेह निवडतील त्या ठिकाणच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. हीच व्यवस्था आजपर्यंत आहे.

Currently Selected:

यहोशुआ 9: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in