YouVersion Logo
Search Icon

मलाखी 3

3
1“मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
2पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल. 3रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील, 4मग पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आणि गतवर्षासारखे पुन्हा एकदा यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी आणलेली अर्पणे याहवेहस मान्य होतील.
5“त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
दशांश देणे
6“मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत. 7तुमच्या पूर्वजांच्या काळापासून तुम्ही माझ्या विधिनियमापासून दूर जात आहात व त्यांचे पालन करीत नाही. माझ्याकडे पुन्हा या व मी तुमच्याकडे परत येईन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
“पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्याकडे परत कसे यावे?’
8“एखादा मर्त्यमनुष्य परमेश्वराला लुबाडू शकेल काय? तरीही तुम्ही मला लुबाडले आहे.
“पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे लुबाडत आहोत?’
“दशांश आणि अर्पणात. 9तुमच्यावर शाप आहे—तुमचे संपूर्ण राष्ट्र—तुम्ही मला लुबाडीत आहात. 10तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही. 11कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. 12“सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी आनंददायी असेल.” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
इस्राएल याहवेहविरुद्ध उर्मटपणे बोलते
13याहवेह म्हणतात, “तुम्ही माझ्याविरुद्ध उर्मटपणे बोलता.”
“तरी तुम्ही विचारता, ‘तुमच्याविरुद्ध आम्ही काय बोललो?’
14“तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते? 15पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ”
विश्वासू अवशिष्ट लोक
16मग याहवेहचे भय बाळगणार्‍यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि याहवेहने ती लक्षपूर्वक ऐकली. नंतर याहवेहच्या समक्ष, एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर याहवेहचे भय बाळगणारे व त्यांच्या नावाचा सन्मान करणारे यांच्यासंबंधीची स्मरण पुस्तिका लिहिण्यात आली.
17सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “त्या दिवशी मी कृती करेन, ते लोक माझी मौल्यवान संपत्ती होतील; आणि ज्याप्रमाणे एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या पुत्राची गय करतो, त्याप्रमाणे मी त्यांची गय करेन. 18मग नीतिमान व दुष्ट माणसे, त्याचप्रमाणे परमेश्वराची सेवा करणारे व सेवा न करणारे यातील फरक तुम्हाला दिसून येईल.”

Currently Selected:

मलाखी 3: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in