YouVersion Logo
Search Icon

मत्तय 13

13
पेरणार्‍याचा दाखला
1त्याच दिवशी येशू घरातून बाहेर पडले आणि सरोवराच्या किनार्‍यावर बसले. 2तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती इतकी मोठी गर्दी केली, म्हणून ते एका होडीत बसून किनार्‍यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागले. 3अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. 4तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. 5काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. 6परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. 7काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले; ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली. 8परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले. 9ज्याला ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”
10आणि त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले व त्यांना विचारले, “लोकांशी तुम्ही दाखल्यांनी का बोलता?”
11यावर येशूंनी खुलासा केला, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिलेले नाही. 12कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांच्याकडे विपुल असेल. ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.
13“ते नेहमी पाहत असले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.
म्हणूनच मी त्यांच्याशी दाखल्यांनी बोलतो! 14त्यांच्याविषयी यशायाह संदेष्ट्याची ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे:
“ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.
15या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा;
त्यांचे कान मंद
आणि त्यांचे डोळे बंद करा.
नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील,
त्यांच्या कानांनी ऐकतील,
अंतःकरणापासून समजतील,
आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’#13:15 यश 6:9
16परंतु तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहतात; तुमचे कान धन्य आहेत, कारण ते ऐकतात. 17कारण मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची अनेक संदेष्ट्यांनी आणि नीतिमान लोकांनी उत्कंठा बाळगली होती.
18“तर पेरणी करणार्‍याच्या दाखल्याचा अर्थ काय आहे ते ऐका: 19वाटेवर पडलेले बी अशा हृदयाच्या लोकांचे प्रतीक आहे की, ते परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता ऐकतात पण त्यातील त्यांना काहीही समजत नाही. मग सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. 20खडकाळ जमिनीत पडलेले बी त्यांच्याप्रमाणे आहेत जे वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. 21परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात. 22काटेरी झाडांमध्ये पेरलेले बी, जे वचन ऐकतात; परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा त्यांना भुरळ पाडते त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ देत नाही, त्यांच्याप्रमाणे आहे. 23परंतु चांगल्या जमिनीत पडलेले बी असा व्यक्ती आहे की जो परमेश्वराचे वचन ऐकतो आणि समजतो आणि मग, जे पेरले होते त्यापेक्षा शंभरपट पीक, साठपट किंवा तीसपट पीक देतो.”
रानगवताचा दाखला
24येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्‍या एका मनुष्यासारखे आहे. 25पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला. 26पीक वाढू लागले, आणि दाणे आले तसे त्याच्याबरोबर रानगवतही दिसू लागले.
27“तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कुठून आले?’
28“तेव्हा मालकाने म्हटले, ‘हे शत्रूने केले आहे.’
“मजुरांनी त्याला विचारले, आम्ही ते उपटून टाकावे काय?
29“ ‘नाही,’ मालक म्हणाला, ‘तुम्ही रानगवत उपटून काढीत असताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 30तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्‍यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ”
मोहरी व खमिराचा दाखला
31येशूंनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, जो एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. 32तो सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी जेव्हा ते वाढते तेव्हा ते बागेतील सर्वात मोठे झाड होते, मग त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी येऊन विसावा घेतात.”
33त्यांनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य त्या खमिरासारखे आहे, जे एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप#13:33 अंदाजे 27 कि.ग्रॅ. पिठात एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ फुगले.”
34या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांद्वारे बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. 35याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे:
“मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन.
जगाच्या उत्पत्तीपासून ठेवलेले रहस्य मी त्यांना सांगेन.”#13:35 स्तोत्र 78:2
रानगवताच्या दाखल्याची फोड
36गर्दीला बाहेर सोडून ते घरात गेले, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “शेतातील रानगवताच्या दाखल्याचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगा.”
37ते म्हणाले, “उत्तम प्रतीचे बी पेरणारा मानवपुत्र आहे. 38जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे. 39गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत.
40“जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल. 41मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल. 42त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल. 43मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.
गुप्तधन व मोती यांचा दाखला
44“स्वर्गाचे राज्य शेतात दडवून ठेवलेल्या धनासारखे आहे. एका मनुष्याला ते सापडले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपविले आणि अतिशय आनंदाने त्याच्याजवळ होते ते सारे विकून ते शेत विकत घेतले.
45“पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे. 46त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले.
जाळ्याचा दाखला
47“आणखी, स्वर्गाचे राज्य मासे धरण्यार्‍या एका जाळ्यासारखे आहे. ते सरोवरात टाकले आणि जाळ्यात सर्वप्रकारचे मासे लागले. 48जाळे भरल्यावर कोळी लोकांनी ते ओढून काठावर आणले. मग खाली बसून त्यांनी चांगले मासे भांड्यात भरले आणि वाईट मासे फेकून दिले. 49युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील. 50आणि त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल.
51“तुम्हाला या सर्वगोष्टी समजल्या काय?” येशूंनी विचारले.
“होय,” ते म्हणाले.
52मग येशू त्यांना म्हणाले, “म्हणून नियमशास्त्राचा प्रत्येक शिक्षक जो स्वर्गाच्या राज्यात शिष्य झाला आहे, तो त्या घरमालकासारखा आहे जो त्याच्या भांडारातून जुने आणि नवे धन काढतो.”
आदर विरहित संदेष्टा
53येशूंनी हे दाखले सांगण्याचे संपविल्यावर ते तिथून निघाले. 54स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले? 55हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय? 56याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?” 57आणि ते त्याच्यावर संतापले.
तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.”
58आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.

Currently Selected:

मत्तय 13: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in