YouVersion Logo
Search Icon

मत्तय 19

19
घटस्फोट
1आपले बोलणे संपविल्यावर येशू गालील प्रांत सोडून यार्देन नदीच्या पार यहूदीया प्रांतात आले. 2लोक मोठ्या संख्येने त्यांच्यामागे जात होते आणि त्यांनी त्यांना बरे केले.
3काही परूशी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तिथे आले. त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने प्रत्येक किंवा कोणत्याही कारणासाठी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?”
4येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’#19:4 उत्प 1:27 5आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’#19:5 उत्प 2:24 6म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
7“मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?”
8यावर येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने तुम्हाला आज्ञा दिली. परंतु मुळात परमेश्वराची तशी इच्छा नव्हती. 9मी तुम्हाला सांगतो, व्यभिचाराच्या कारणाशिवाय जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”
10येशूंचे शिष्य त्यांना म्हणाले, “जर अशी परिस्थिती पती आणि पत्नीमध्ये असेल, तर मग लग्न न केलेले बरे.”
11येशू म्हणाले, “हे शिक्षण प्रत्येकाला स्वीकारता येईल असे नाही; पण ज्यांना तसे दान दिले आहे, त्यानांच ते स्वीकारता येईल. 12कारण काहीजण जन्मतःच नपुंसक असतात आणि काही जणांना मनुष्यांनीच तसे केलेले असते; आणि काहींनी स्वर्गाच्या राज्यासाठी ही जीवनपद्धती स्वीकारली आहे. ज्यांना ही स्वीकारावयाची आहे, त्यांनी ती स्वीकारावी.”
लहान बालके आणि येशू
13येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे व प्रार्थना करावी म्हणून लोक आपल्या लहान बालकांना येशूंकडे घेऊन आले. परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.
14येशू शिष्यांना म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे.” 15त्या ठिकाणाहून निघण्यापूर्वी येशूंनी त्यांच्यावर हात ठेवले.
श्रीमंत आणि परमेश्वराचे राज्य
16आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”
17तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्‍या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”
18“कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले.
येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, 19तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’#19:19 निर्ग 20:12‑16; अनु 5:16‑20 आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ ”#19:19 लेवी 19:18
20तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?”
21येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
22पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती.
23मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे! 24मी पुन्हा सांगतो की, श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
25येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
26येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
27यावर पेत्र येशूंना म्हणाला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे; त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल?”
28येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, सर्व गोष्टीचे नूतनीकरण होईल, तेव्हा मानवपुत्र गौरवी सिंहासनावर बसेल आणि जे तुम्ही मला अनुसरता ते तुम्ही सुद्धा बारा सिंहासनावर बसाल व इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल. 29ज्या कोणी मला अनुसरण्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, मालमत्ता यांचा त्याग केला आहे, त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, पण सार्वकालिक जीवनही मिळेल. 30पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.”

Currently Selected:

मत्तय 19: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in