21
यरुशलेमात राजा म्हणून येशूंचा प्रवेश
1ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, 2त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तिथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा. 3कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.”
4संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:
5“सीयोनकन्येला सांगा की,
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे.
तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे,
आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”#21:5 जख 9:9
6शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले. 7त्यांनी गाढवी व शिंगरू आणली आणि त्यांचे वस्त्रे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले. 8गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या. 9मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
“दावीदाच्या पुत्राला होसान्ना!”#21:9 इब्री भाषेमध्ये तारण कर, स्तुती, 15 वचनामध्ये
“प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.”#21:9 स्तोत्र 118:25‑26
“सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”#21:9 हिब्रू भाषेमधील या शब्दाचा अर्थ “वाचविणे” असा होतो, या शब्दाचा उपयोग करून “वाचवा, वाचवा” असा स्तुती जयघोष. वचन 15 पाहा.
10येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?”
11“हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.”
मंदिरात येशू
12येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली. 13ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर#21:13 यश 56:7 म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”#21:13 यिर्म 7:11
14मग मंदिरात त्यांच्याकडे आंधळे व अपंग लोक आले आणि त्यांनी त्यांना बरे केले. 15तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षकांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले.
16त्यांनी येशूंना विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत, हे तुम्ही ऐकत आहात ना?”
येशूंनी उत्तर दिले, “हो, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
“ ‘लेकरे आणि तान्ही बालके यांच्याद्वारे
हे प्रभू तू आपली स्तुती प्रकट केली आहे,’ ”#21:16 स्तोत्र 8:2
17मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.
येशू अंजिराच्या झाडाला शाप देतात
18अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. 19जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.
20हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”
21मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल. 22तुम्ही विश्वास ठेऊन आणि प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”
येशूंच्या अधिकारास आव्हान
23येशूंनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि ते शिकवीत असता मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले व त्यांना जाब त्यांना विचारू लागले, “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”
24येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या मग मी कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे तुम्हाला सांगेन. 25योहानाला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कुठून प्राप्त झाला होता, स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून?”
या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली, “योहानाचा बाप्तिस्मा, ‘स्वर्गापासून होता,’ असे आपण म्हणालो, तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही’? 26जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता’ तर आम्हाला लोकांची भीती आहे. कारण योहान संदेष्टा होता, असा सर्वांचाच ठाम विश्वास होता.”
27शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.”
यावर येशू म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हाला सांगणार नाही.
दोन पुत्रांचा दाखला
28“तुम्हाला काय वाटते? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाला म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यामध्ये जा व काम कर.’ ”
29मुलगा म्हणाला, “ ‘मी द्राक्षमळ्यात जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला.
30“मग पिता धाकट्या मुलालाही तसेच म्हणाला. मुलगा म्हणाला, ‘मी जातो, बाबा.’ पण तो गेलाच नाही.”
31मी विचारतो, “पित्यास जे पाहिजे होते ते या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने केले?”
“वडील मुलाने,” त्या लोकांनी उत्तर दिले.
मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाले, “मी खरे सांगतो, जकातदार लोक आणि वेश्या तुमच्या आधी परमेश्वराच्या राज्यात जात आहेत. 32कारण योहान नीतिमत्वाचा मार्ग दाखवित तुम्हाकडे आला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट जकातदार लोक आणि वेश्यांनी तसे केले. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही, तुम्ही पश्चात्ताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले.
कुळांचा दाखला
33“दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन दुसर्या ठिकाणी राहवयास गेला. 34हंगामाचे दिवस आल्यावर फळातून काही मिळावे म्हणून त्याने नोकरांना शेतकर्यांकडे पाठविले.
35“परंतु शेतकर्यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्याला ठार केले आणि तिसर्याला दगडमार केला. 36मग जमीनदाराने त्यांच्याकडे पहिल्या वेळेपेक्षा जास्त नोकर पाठविले. पण त्यांनाही त्यांनी तसेच केले. 37सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’
38“पण शेतकर्यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’ 39त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला.
40“आता, जेव्हा द्राक्षमळ्याचा धनी येईल, त्यावेळी तेव्हा तो त्या भाडेकर्यांचे काय करेल असे तुम्हाला वाटते?”
41त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्या शेतकर्यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”
42येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय:
“ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला,
तोच कोनशिला झाला आहे;
प्रभूने हे केले आहे,
आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’#21:42 स्तोत्र 118:22‑23
43“यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल. 44या खडकावर जे आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”#21:44 काही मूळ प्रतींमध्ये हे वचन 44 आढळत नाही
45आपल्याविषयीच या गोष्टीमधून येशू बोलत आहेत हे महायाजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले, 46तेव्हा येशूंना अटक करण्याचा ते काहीतरी मार्ग शोधू लागले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोक येशूंना संदेष्टा मानीत होते.