24
युगाच्या समाप्तीची चिन्हे व मंदिराचा नाश
1येशू मंदिरातून बाहेर पडले व चालत असता त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. 2येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.”
3येशू मंदिराच्या समोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, शिष्य त्यांच्याकडे एकांतात आले आणि विचारले, “या घटना केव्हा घडतील आणि तुमच्या येण्याचे आणि या युगाच्या समाप्तीची चिन्हे काय असतील हे आम्हाला सांगा.”
4येशूंनी त्यांना म्हटले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. 5कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. 6तुम्ही लढायासंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, पण त्यामुळे घाबरू नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे. 7कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील. 8या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.
9“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. 10त्यावेळी पुष्कळजण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील. 11अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील. 12दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. 13परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल. 14सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.
15“संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’#24:15 दानी 9:27; 11:31; 12:11 पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे— 16त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. 17जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये. 18जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. 19गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! 20तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये म्हणून प्रार्थना करा. 21कारण ते दिवस इतके भयानक असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.
22“ते दिवस जर कमी केले गेले नसते, तर कोणी वाचले नसते. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. 23त्या काळात ‘येथे ख्रिस्त आहे,’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. 24कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. 25पाहा मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेले आहे.
26“जर कोणी तुम्हाला सांगेल, ‘तो तिथे रानात आहे,’ तर तिकडे जाऊ नका किंवा तो तिथे ‘आतील खोलीत आहे,’ तर विश्वास ठेवू नका. 27कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल. 28जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.
29“क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर
“ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल,
आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;
आकाशातून तारे गळून पडतील,
आणि आकाशमंडळ डळमळेल.’#24:29 यश 13:10; 34:4
30“मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे#24:30 किंवा देशाची गोत्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील.#24:30 दानी 7:13‑14 31तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.
32“आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. 33या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी जवळ, दारातच आहे हे समजून घ्या. 34मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. 35आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
दिवस आणि घटका अज्ञात आहे
36“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. 37जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. 38जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. 39आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल. 40शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. 41जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.
42“यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही. 43पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते. 44म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.
45“तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो. 46धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय. 47मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल. 48परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ 49आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल. 50तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. 51त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.