YouVersion Logo
Search Icon

मार्क 1

1
बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग तयार करतो
1परमेश्वराचा पुत्र#1:1 परमेश्वराचा पुत्र काही मूळप्रतींमध्ये हा शब्द आढळत नाही येशू ख्रिस्त,#1:1 ख्रिस्त अर्थ अभिषिक्त यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ. 2यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे:
“मी माझा संदेशवाहक तुमच्या पुढे पाठवीन,
तो तुमचा मार्ग तयार करील,”#1:2 मला 3:1
3“अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली,
‘प्रभुसाठी मार्ग तयार करा,
आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”#1:3 यश 40:3
4आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला. 5यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमेतील लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे. 6योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कपड्याचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधीत असे.#1:6 पारंपारिकपणे संदेष्ट्यांशी असलेले कपडे (पहा 2 राजे 1:8; जख 13:4) तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. 7त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर असा एकजण येत आहे, जो माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहे व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. 8मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”
येशूंचा बाप्तिस्मा आणि परीक्षा
9त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. 10येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले 11त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
12नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले, 13रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली.
येशू शुभवार्ता जाहीर करतात
14योहानाला बंदीत टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. 15ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”
येशूंचे त्यांच्या प्रथम शिष्यांना बोलावणे
16एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. 17येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” 18हे ऐकताच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
19थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. 20त्यांनी उशीर न करता त्यांना बोलावले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले.
येशू एका दुरात्म्याला हाकलून देतात
21ते कफर्णहूम या शहरात आले, शब्बाथ#1:21 शब्बाथ आठवड्याचा सातवा दिवस जो विश्रांतीचा व पवित्र पाळत असत. दिवशी सभागृहामध्ये जाऊन येशूंनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. 22त्यांच्या शिकवणकीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते. 23इतक्यात, सभागृहामध्ये दुरात्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला, 24“हे नासरेथकर येशू, आम्हाकडून तुला काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!”
25“गप्प राहा!” येशूंनी धमकावले, “यातून बाहेर ये!” 26त्या दुरात्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला.
27हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते दुरात्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” 28त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली.
येशू अनेकांना बरे करतात
29सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहान यांच्याबरोबर शिमोन व आंद्रिया यांच्या घरी गेले. 30तेथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले. 31येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
32त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले. 33संपूर्ण शहर दारात गोळा झाले होते, 34तेव्हा येशूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी ग्रासलेल्या पुष्कळांना बरे केले व अनेक दुरात्म्यांना हाकलून दिले, परंतु दुरात्म्यांना बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते कोण आहेत, हे त्यांना माहीत होते.
येशू एकांतस्थळी प्रार्थना करतात
35अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तेथे त्यांनी प्रार्थना केली. 36शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तेथे गेले. 37ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “प्रत्येकजण तुमचा शोध करीत आहे!”
38येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कोठेतरी आसपासच्या खेड्यात जाऊ म्हणजे मला तेथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.” 39मग त्यांनी गालील प्रांतात सर्वठिकाणी प्रवास केला, ते त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले.
येशू कुष्ठरोग्याला बरे करतात
40एक कुष्ठरोगी#1:40 ग्रीक शब्द कुष्ठरोग चामड्यांच्या विविध आजारांसाठी वापरला जात असे. येशूंकडे येऊन गुडघे टेकून विनंती करून म्हणाला, “तुमची इच्छा असल्यास तुम्ही मला शुद्ध करू शकता.”
41येशूंना कळवळा आला. येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो!” 42तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग निघून गेला आणि तो शुद्ध झाला.
43येशूंनी त्याला निक्षून सांगितले: 44“पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस, याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.” 45याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तेथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.

Currently Selected:

मार्क 1: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in