26
1ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे,
त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही.
2जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते,
तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही.
3घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम
आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे!
4मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको,
नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील.
5मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या,
नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.
6मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे
म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे.
7मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे,
एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे.
8मूर्खाचा सन्मान करणे
म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे.
9जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी,
तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने.
10जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो.
तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्या धनुर्धारीसारखा आहे.
11जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो
तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.
12आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय?
अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
13आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे,
एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!”
14दार त्याच्या बिजागर्यांवर फिरते
तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो.
15आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो;
तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो.
16स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो
यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.
17आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे
एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्यासारखे असतात.
18जसा एखादा माथेफिरू
मृत्यूचे जळते बाण फेकतो,
19तो अशा मनुष्यासारखा आहे,
जो त्याच्या शेजार्यांना फसवितो
आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!”
20लाकूड नसले तर आग विझते;
आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
21जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते,
तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो.
22अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात;
अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
23गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण
चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे.
24शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात,
परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात.
25जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका,
कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते.
26त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी,
त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल.
27जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल;
जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.
28लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते,
आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.