YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 3

3
सुज्ञान कल्याण प्रदान करते
1माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस,
परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;
2कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील,
आणि तुला शांती आणि समृद्धी देतील.
3प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत;
त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध,
त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.
4तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून
अनुग्रह आणि सत्कीर्ती प्राप्त होतील.
5तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव;
आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
6तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा,
आणि ते तुझे मार्ग सुकर#3:6 किंवा तुझे मार्गदर्शन करतील.
7स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस;
परंतु याहवेहचे भय बाळग आणि वाईटापासून दूर राहा.
8हे तुझ्या देहाला आरोग्य देईल
आणि तुझ्या हाडांना पोषकसत्व असे होईल.
9तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी
याहवेहचा सन्मान कर;
10तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील,
आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील.
11माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस;
आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;
12कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,
याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!
13ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते
व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य.
14कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे,
आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते.
15ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे,
तुला आवडणार्‍या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही.
16तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे;
आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत.
17तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत,
आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे.
18जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे;
जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील.
19सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला,
शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली;
20त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली,
आणि मेघांनी दवबिंदू पाडले.
21माझ्या मुला, सुज्ञान आणि शहाणपण तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस,
खरे न्यायीपण आणि विवेक जपून ठेव;
22तीच तुझ्यासाठी जीवन असतील,
ती तुझ्या गळ्याला कृपेचा अलंकार असतील.
23मग तू तुझ्या मार्गाने सुरक्षित चालशील,
आणि तुझा पाय अडखळणार नाही.
24तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही;
जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल.
25अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस,
किंवा दुष्टांचा नाश होत असला तरी भिऊ नकोस;
26कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील
आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत.
27ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले,
तर ते करण्यास नाकारू नकोस.
28एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना
“तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन”
असे तुझ्या शेजार्‍याला म्हणू नकोस.
29तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना,
त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस.
30जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल,
तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस.
31हिंसा करणार्‍यांचा हेवा करू नकोस,
किंवा त्यांच्या कोणत्याही मार्गाची निवड करू नकोस.
32कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते,
परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात.
33याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो,
परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात.
34उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात,
परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.
35ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो,
परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in