YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 108

108
स्तोत्र 108
एक गीत. दावीदाचे एक स्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे;
मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.
2अगे सारंगी आणि वीणे, जागृत व्हा!
मी प्रातःकाळाला जागृत करेन.
3हे याहवेह, प्रत्येक राष्ट्रात मी तुमची स्तुती करेन,
मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
4कारण तुमचे वात्सल्य महान, गगनमंडळाहून उंच आहे;
तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
5हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत;
तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
6आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा,
म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.
7परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली:
“मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन,
आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
8गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे;
एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे,
यहूदाह माझा राजदंड आहे.
9मोआब माझे हात धुण्याचे पात्र,
आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन;
पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”
10मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल?
मला एदोम प्रांतात कोण नेईल?
11परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना,
आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?
12शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा,
कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.
13परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे,
आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in