YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 139

139
स्तोत्र 139
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि
मला ओळखले आहे.
2माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता;
दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.
3माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात;
माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.
4हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच,
ते सर्व तुम्हाला माहीत असतात.
5तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता;
तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.
6हे ज्ञान इतके भव्य व अद्भुत आहे,
की इतक्या उदात्ततेपर्यंत पोहोचणे मला अशक्य आहे.
7तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ?
तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?
8मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात;
अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.
9मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन
अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली,
10तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील;
तुमचा उजवा हात मला आधार देईल.
11मी म्हणालो, “अंधार मला लपवून टाकेल,
आणि माझ्या सभोवतीचा प्रकाश रात्रीत बदलून जाईल,”
12अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र
दिवसासारखीच प्रकाशमान आहे;
कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.
13माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;
माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
14मी तुमची स्तुती करतो,
कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे;
तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे,
हे मी पूर्णपणे जाणतो.
15गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना,
जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता,
जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती.
16तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले;
माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या
आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली.
17हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत!
अबब, किती अगणित आहेत ते!
18जर मी त्याची गणती केली,
तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल—
मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो.
19हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल!
अहो रक्तपिपासू लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा!
20ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात;
तुमचे शत्रू तुमच्या नामाचा गैरवापर करतात.
21याहवेह, तुमचा द्वेष करणार्‍यांचा मीही द्वेष करू नये काय
आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्‍यांचा मी तिरस्कार करू नये काय?
22मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो;
मी त्यांना माझे शत्रू मानतो.
23हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा;
माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.
24बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही,
आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in