YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 147

147
स्तोत्र 147
1याहवेहचे स्तवन करा.
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम,
किती यथार्थ आहे!
2यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे;
इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत.
3भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,
आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.
4ते तार्‍यांची गणती करतात
आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे.
5ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे;
त्यांची बुद्धी अपरिमित आहे.
6याहवेह नम्रजनांस आधार देतात,
परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात.
7याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा;
वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.
8ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात;
पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात
आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात.
9ते पशूंना त्यांचा आहार पुरवितात
व हाक मारणार्‍या कावळ्यांच्या पिलांना अन्न देतात.
10घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही,
मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही.
11याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात,
तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.
12यरुशलेम, याहवेहचा महिमा कर;
सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर.
13कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत
आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.
14ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात;
ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात.
15ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात;
त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो.
16शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात
आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात.
17ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात.
त्यांच्या गोठविणार्‍या थंडीपुढे कोण टिकेल?
18परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात,
तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो.
19त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत
आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.
20इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही;
ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत.
याहवेहचे स्तवन करा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in