YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 17

17
स्तोत्र 17
दावीदाची एक प्रार्थना.
1याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे,
माझ्या आरोळीकडे लक्ष द्या.
माझी प्रार्थना ऐका,
जी कपटी ओठातून येत नाही.
2तुम्ही माझा रास्त न्याय करा;
जे नीतियुक्त तेच तुमच्या दृष्टीस पडो.
3जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे,
रात्रीच्या वेळी तुम्ही माझी झडती घेतली आहे,
तुम्ही मला पारखून पाहिले, तरी माझ्यात तुम्हाला दोष आढळला नाही;
माझ्या मुखाने मी अपराध केले नाही.
4जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला,
तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार
मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले.
5माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत,
माझी पावले कधी घसरली नाहीत.
6मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल;
माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका.
7तुमचा आश्रय घेणार्‍यांना
त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता,
तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.
8तुमच्या पंखांच्या छायेखाली
तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;
9मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून,
जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा.
10त्यांचे हृदय निर्दयी आहे,
त्यांच्या मुखाचे शब्द गर्विष्ठपणाचे असतात.
11त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे,
मला धुळीस मिळविण्यासाठी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली आहे.
12शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे,
दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत.
13हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा;
तुमच्या तलवारीने दुष्टांपासून माझा बचाव करा.
14याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा,
ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे.
जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो,
त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ,
आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.
15मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार;
मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in