YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 22

22
स्तोत्र 22
संगीत दिग्दर्शकासाठी. “पहाटेची हरिणी” या रागावर बसविलेले दावीदाचे स्तोत्र.
1माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?
मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले,
माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का?
2माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही,
रात्री पण मला कोणताही विसावा नाही.#22:2 किंवा मी शांत राहत नाही
3तरीपण तुम्ही पवित्र आहात;
इस्राएलाच्या स्तवनांवर तुम्ही विराजमान आहात.
4तुमच्यावर आमच्या पूर्वजांनी भरवसा ठेवला;
तुमच्यावर त्यांनी भरवसा ठेवला आणि तुम्ही त्यांना सोडविले.
5त्यांनी तुमचा धावा केला आणि तुम्ही त्यांना वाचविले;
तुमच्यावरील विश्वासाने त्यांना लज्जित होऊ दिले नाही.
6परंतु मी तर कीटक आहे, मनुष्य नाही,
मनुष्याकडून माझा तिरस्कार आणि अवहेलना झाली आहे.
7मला पाहून ते माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,
8ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे,
याहवेह त्याला मुक्त करो.
तेच त्याची सुटका करो,
कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.”
9तुम्हीच मला माझ्या आईच्या उदरातून सुखरुप बाहेर काढले;
मी माझ्या आईच्या कुशीत होतो, तेव्हापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे;
10मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे.
मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात.
11माझ्यापासून दूर राहू नका,
कारण संकट जवळ आहे
आणि मला साहाय्य करणारा कोणी नाही.
12अनेक बैलांनी मला घेरले;
बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.
13गर्जना करीत आपल्या भक्ष्यांवर तुटून पडणार्‍या सिंहाप्रमाणे
उघड्या जबड्यांनी ते माझ्यावर चालून येत आहेत.
14माझी शक्ती पाण्याप्रमाणे निथळून गेली आहे,
माझी सर्व हाडे सांध्यातून निखळली आहेत;
माझे हृदय मेणासारखे झाले आहे;
ते आतल्याआत वितळून गेले आहे.
15माझे मुख#22:15 किंवा माझी शक्ती खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे;
माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे;
तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
16मला कुत्र्यांनी वेढले आहे,
दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे;
त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे.
17माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो,
हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.
18ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.
19परंतु याहवेह, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका;
हे माझ्या सामर्थ्या, माझ्या साहाय्यासाठी त्वरेने या.
20तलवारीपासून मला सोडवा,
कुत्र्यांच्या आक्रमणापासून माझे मोलवान प्राण वाचवा.
21सिंहाच्या जबड्यातून;
रानटी बैलांच्या शिंगापासून माझे रक्षण करा.
22मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन;
मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन.
23जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा!
याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा!
इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा.
24कारण त्यांनी दुःखितांचे दुःख,
तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही;
त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही
परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला.
25महासभेत उभा राहून तुमची स्तुती करण्याची प्रेरणा तुमच्याकडूनच येत आहे;
तुमचे भय धरणार्‍यांपुढे मी माझे नवस फेडीन.
26नम्र लोक खातील आणि तृप्त होतील;
जे याहवेहचा शोध करतात, ते त्यांची स्तुती करतील.
तुमची हृदये सर्वदा सजीव असो!
27सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील;
दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील;
आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब
त्यांच्यासमोर नतमस्तक होतील.
28कारण याहवेहचेच राज्य आहे
आणि सर्व राष्ट्रांवर तेच अधिपती आहेत.
29पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक मेजवानी व उपासना करतील;
जे लोक स्वतःला वाचवू शकत नाहीत
व धुळीस मिळणारे प्रत्येक त्यांच्यासमोर गुडघे टेकतील.
30येणारी संपूर्ण पिढी त्यांची सेवा करेल;
पुढच्या पिढीला ती प्रभूच्या अद्भुत कृत्यांबद्दल सांगेल.
31ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील,
आणि न जन्मलेल्या पिढीला
त्यांनीच हे सर्व केले असे जाहीर करतील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in