YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 44

44
स्तोत्र 44
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील
1हे परमेश्वरा, प्राचीन काळी
तुम्ही आमच्या पूर्वजांच्या
दिवसांत केलेल्या कार्याचे वर्णन त्यांनी आम्हाला सांगितले आणि
आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे.
2तुम्ही आपल्या हातांनी राष्ट्रांना घालवून दिले
आणि तिथे आमच्या पूर्वजांना स्थापित केले;
तुम्ही त्या लोकांना चिरडले
आणि आमच्या पूर्वजांना समृद्ध केले.
3त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही,
आणि त्यांच्या बाहुबलाने त्यांना विजयी केले असेही नाही;
हे तुमच्या उजव्या हाताने, तुमच्या भुजांनी
आणि तुमच्या मुखप्रकाशाने हे केले, कारण तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली.
4तुम्ही माझे राजा आणि परमेश्वर आहात,
जे याकोबाच्या विजयाचा आदेश देतात.
5कारण केवळ तुमच्याच शक्तीने व तुमच्याच नावाने,
आम्ही आमचे शत्रू पायाखाली तुडवू शकलो.
6मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही.
माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही.
7आमच्या शत्रूंवर तुम्हीच आम्हाला विजय मिळवून देता;
आमचा द्वेष करणार्‍यांना तुम्ही लज्जित करता.
8आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो.
आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला
9परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली;
आमच्या सैन्यासोबत तुम्ही जात नाही.
10तुम्ही आम्हास शत्रूंपुढे पाठ फिरविण्यास लावले आहे,
आणि आमचा द्वेष करणारे आम्हाला लुटतात.
11तुम्ही आम्हाला मेंढराप्रमाणे नष्ट होण्यासाठी सोडून दिले,
आणि राष्ट्रांमध्ये आमची पांगापांग केली.
12तुम्ही आम्हाला कवडीमोलाने विकले;
तुम्हाला त्याचा काहीच फायदा झाला नाही.
13तुम्ही आमच्यावर पाठविलेल्या सर्व अरिष्टांमुळे शेजारची राष्ट्रे
आम्हाला हसतात आणि आमची थट्टा करतात.
14तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये उपहास असे केले आहे;
लोक आमच्याकडे पाहून डोके हालवितात.
15सर्व दिवस मी अपमानित राहतो,
आणि लज्जेने माझा चेहरा झाकला आहे.
16टोमणे मारणारे व दुर्भाषण करणार्‍या शब्दामुळे,
शत्रू आणि सूड उगवणार्‍यांमुळे माझी विटंबना होते.
17आमच्यावर हे प्रसंग आले असताना
आम्ही तुम्हाला विसरलो नाही;
आम्ही तर तुमचा करार मोडलेला नव्हता.
18आम्ही तुम्हाला सोडले नाही;
तुमच्या मार्गातून आमचे पाय ढळले नाही.
19पण तुम्ही आम्हाला चिरडले आणि आम्हाला कोल्ह्यांच्या गुहेत ठेवले.
तुम्ही आम्हाला सर्वात गडद अंधारात लपविले आहे.
20जर आम्ही आमच्या परमेश्वराचे नाव विसरलो असतो,
किंवा अन्य दैवतांपुढे हात पसरविले असते,
21तर परमेश्वराला ते समजले नसते काय?
कारण हृदयातील प्रत्येक गुप्त विचार त्यांना माहीत असतात.
22तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो;
वधाची प्रतीक्षा करणार्‍या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.
23हे प्रभू, उठा, जागे व्हा! तुम्ही का झोपलात?
जागृत व्हा! आमचा कायमचा त्याग करू नका.
24तुम्ही आपले मुख का लपविता?
आमची दुःखे आणि आमचा छळ याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
25आमचा जीव धुळीस मिळत आहे;
आमची शरीरे जमिनीला चिकटली आहेत.
26आम्हाला साहाय्य करण्यास उठा;
तुमच्या अढळ प्रीतीने आम्हाला सोडवा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in