YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 55

55
स्तोत्र 55
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दावीदाचे मासकील.
1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका;
माझ्या विनवणीकडे दुर्लक्ष करू नका.
2माझे ऐका आणि मला उत्तर द्या;
माझ्या विचारांनी मी त्रस्त आणि व्याकूळ झालो आहे.
3माझ्या शत्रूंच्या आवाजाने
आणि दुष्टांच्या धमक्यांमुळे मी कण्हत आहे,
कारण ते माझ्यावर अनर्थ आणतात
आणि रागाने माझी निर्भत्सना करतात.
4माझ्या हृदयात अत्यंत मनोवेदना होत आहेत;
मरणाची भीती मला दडपून टाकीत आहे.
5भीती आणि कंप यांनी मला ग्रस्त केले आहे.
अतिभयाने मला ग्रासले आहे.
6अहाहा, मला कबुतराचे पंख असते तर किती उत्तम झाले असते!
दूर उडत जाऊन मी विश्रांती घेतली असती.
7अतिदूरच्या रानात मी उडून गेलो असतो
आणि तिथेच वस्ती केली असती. सेला
8या तुफानी वारा आणि वादळापासून
मी माझ्या आश्रयस्थानी उडून गेलो असतो.
9प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका,
कारण शहरात मला हिंसा आणि कलह दिसतात.
10रात्रंदिवस ते तटाभोवती फिरत असतात;
दुष्टपणा व अनीतिमानपणा नगरात आहे.
11नगरात विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत;
धमक्या आणि खोट्या गोष्टी कधीही त्यांचा मार्ग सोडत नाही.
12ज्याने माझी निंदा केली,
तो काही माझा शत्रू नव्हता;
असता तर मी ते सहन केले असते;
मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.
13परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य,
माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र,
14जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो,
तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील
मधुर सहभागितेचा
मी आनंद घेतला होता.
15मृत्यू माझ्या शत्रूंना अकस्मात गाठो;
ते जिवंतच अधोलोकात उतरले जावोत,
कारण त्यांच्या घरात, त्यांच्या आत्म्यात दुष्टपणा आहे.
16मी तर परमेश्वराचा
धावा करेन आणि याहवेह माझे तारण करतील.
17संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी
मी वेदनांनी आरोळी देईन
आणि ते माझी वाणी ऐकतील.
18जरी माझे बरेच विरोधक तिथे होते,
जे युद्ध माझ्याविरुद्ध सुरू होते,
तरी ते मला कोणतीही इजा होऊ न देता सोडवितात.
19परमेश्वर प्राचीन काळापासून
राजासनारूढ आहेत, जे बदलत नाहीत—
ते त्यांचे ऐकतील व त्यांना नम्र करतील,
कारण त्यांना परमेश्वराचे भय नाही. सेला
20माझा जोडीदार आपल्याच मित्रांवर प्रहार करीत आहे;
त्याने केलेला करार तोच मोडत आहे.
21त्याचे शब्द लोण्याप्रमाणे मृदू वाटतात,
पण त्याच्या अंतःकरणात युद्ध सुरू आहे;
त्याचे शब्द तेलापेक्षाही मऊ होते,
पण उगारलेल्या तलवारींसारखे होते.
22तू आपला भार याहवेहवर टाक
आणि ते तुला आधार देतील;
नीतिमानाला ते कधीही
विचलित होऊ देणार नाही.
23परंतु, हे परमेश्वरा, तुम्ही शत्रूंना
नाशाच्या गर्तेत लोटून द्याल;
खुनी आणि लबाड लोक
त्यांचे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत.
परंतु मी तर तुमच्यावरच भरवसा ठेवतो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in