14
विश्वासात दुर्बल असलेल्यांशी सहिष्णुता
1विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका. 2कोणा एकाचा विश्वास असा आहे की त्याला कोणतेही खाणे निषिद्ध नाही, परंतु ज्याचा विश्वास दुर्बल तो शाकभाजीच खातो. 3जो कोणी सर्वकाही खातो त्याने न खाणार्याला तुच्छ ठरवू नये, आणि जो कोणी सर्वकाही खात नाही त्याने खाणार्याचा न्याय करू नये; कारण परमेश्वराने त्याचा स्वीकार केला आहे. 4दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
5कोणी मनुष्य एखादा दिवस दुसर्या दिवसापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो; आणखी कोणी सर्व दिवस सारखेच मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाने पूर्ण खात्री करून घ्यावी. 6जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो. 7कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. 8आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत. 9ख्रिस्त याचसाठी मृत्यू पावले व पुन्हा जिवंत झाले की त्यांनी मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
10तर तू आपल्या बंधूला व भगिनीला दोषी का ठरवितोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का मानतोस? आपणा सर्वांस परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहवयाचे आहे. 11कारण असे लिहिले आहे:
“ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’
‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल;
आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ”#14:11 यश 45:23
12तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
13यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये. 14मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूंमध्ये माझी खात्री आहे, की कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही; तरी अमुक पदार्थ अशुद्ध आहे, असे समजणार्यासाठीच तो अशुद्ध आहे. 15तुझ्या बंधूला किंवा भगिनीला अन्नामुळे क्लेश झाले तर तू प्रीतीने वागेनासा झाला आहेस. ज्यासाठी ख्रिस्त मरण पावले त्यांचा नाश तुझ्या खाण्यामुळे करू नको. 16तुमच्या दृष्टीने जे चांगले ते तुम्हाला माहीत आहे, त्याबद्दल वाईट बोलण्याचा प्रसंग आणू नका. 17परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे. 18कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.
19तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे. 20अन्नामुळे परमेश्वराच्या कामाचा नाश करू नका. सर्व अन्न शुद्धच आहे; परंतु जो व्यक्ती काहीही खाण्यामुळे इतरांना अडखळवितो त्याला ते वाईट आहे. 21मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.
22तुझ्याठायी जो विश्वास आहे तो तू परमेश्वरासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्यायनिवाडा करावा लागत नाही तो धन्य, 23पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.