YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस 7

7
नियमापासून सुटका, ख्रिस्ताला जडून राहणे
1बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यांना नियमशास्त्र माहीत आहे, त्यांच्याबरोबर मी बोलतो, एखादी व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राचे प्रभुत्व तिच्यावर राहते हे तुम्हाला समजत नाही काय? 2उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत त्याला बांधलेली असते, परंतु जर तिचा पती मरण पावला, तर ती ज्या नियमाद्वारे त्याला बांधलेली असते त्यापासून मुक्त होते. 3पती जिवंत असताना, तिने दुसर्‍या पुरुषाशी संबंध ठेवले तर तिला व्यभिचारिणी म्हणतात; पण पती मरण पावल्यावर ती त्या नियमापासून मुक्त होते; नंतर तिने दुसर्‍या पुरुषाशी विवाह केला, तर ती व्यभिचारिणी होत नाही.
4त्याप्रमाणे बंधू व भगिनींनो, तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मृत झाले आहात, म्हणून तुम्ही दुसर्‍याचे, जो मरणातून उठविला गेला त्याचे व्हावे यासाठी की तुम्ही परमेश्वरासाठी फळ द्यावे. 5आपण पापी स्वभावाच्या नियंत्रणात होतो, व ज्या कृत्यांचे फळ मरण आहे, ती करावयास आपल्या वासना नियमानुसार आपल्यामध्ये कार्य करीत होत्या. 6परंतु आता ज्याने आपल्याला बांधून ठेवले होते, त्याला आपण मेलेले आहोत, म्हणून नियमशास्त्रातील जुन्या लेखाप्रमाणे नव्हे, तर एका नव्या आत्म्याच्या मार्गाने सेवा करू या.
नियम आणि पाप
7तर मग आपण काय म्हणावे? नियम पापमय आहे का? नक्कीच नाही! नियमाशिवाय पाप काय आहे हे मला समजले नसते. “तू लोभ करू नको,”#7:7 निर्ग 20:17; अनु 5:21 असे नियमशास्त्र मला म्हणाले नसते, तर लोभ काय आहे हे मला कधीच समजले नसते. 8परंतु पापाने नियमांचा फायदा घेऊन संधी साधून माझ्यामध्ये सर्वप्रकारचा लोभ उत्पन्न केला; कारण नियमांशिवाय पाप मृत आहे. 9अशी वेळ होती जेव्हा मी नियमशास्त्राशिवाय जिवंत होतो; परंतु आज्ञा आल्यावर, पाप जीवित झाले आणि मी मरण पावलो. 10वास्तविक ज्या आज्ञांनी जीवन द्यावयास पाहिजे होते, त्याच आज्ञांनी मरण आले हे मला आढळून आले. 11पापाने आज्ञांच्या योगे गैरफायदा घेऊन मला फसविले, आणि आज्ञांच्या द्वारे मला ठार मारले. 12वास्तविक नियमशास्त्र पवित्र आहे, आणि आज्ञा पवित्र, न्याययुक्त आणि उत्तम आहेत.
13परंतु जे उत्तम ते माझ्या मरणास कारणीभूत झाले काय? असे नक्कीच नाही. पाप ते पाप दिसावे, आणि चांगल्याद्वारे पापाने माझ्यामध्ये मृत्यू उत्पन्न केला, यासाठी की आज्ञेद्वारे पाप हे पराकोटीचे पाप दिसून यावे.
14नियमशास्त्र आध्यात्मिक आहे; हे आपल्याला माहीत आहे. पण मी तर पापाला गुलाम म्हणून विकलेला दैहिक प्राणी आहे. 15मी काय करतो हे मला समजत नाही. कारण जे मला करावेसे वाटते, ते मी करत नाही, जे करण्याचा मला तिटकारा येतो, तेच मी करीत असतो. 16जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. 17कारण या गोष्टी करणारा मी स्वतः नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेले पाप करते. 18माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही. 19चांगले करावे असे मला वाटते, पण मी ते करीत नाही, परंतु वाईट जे मला करावेसे वाटत नाही ते मी करीत राहतो. 20आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते.
21योग्य ते करावे, असे मला वाटते, पण वाईट माझ्या अगदी जवळच असते, हा नियम कार्यरत आहे असे मला आढळते. 22परमेश्वराच्या नियमामुळे माझ्या अंतःकरणात मी आनंद करतो. 23पण माझ्यामध्ये आणखी एक नियम आढळतो, आणि तो माझ्या मनातील नियमाशी युद्ध करतो आणि मला कैद करतो व मला पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. 24मी किती कष्टी मनुष्य! या मृत्यूच्या शरीरापासून मला कोण सोडवेल? 25परमेश्वराचा धन्यवाद असो! जे येशू ख्रिस्त आपला प्रभू यांच्याद्वारे मला मुक्त करतात.
मी स्वतः माझ्या मनामध्ये परमेश्वराच्या नियमाचा गुलाम, परंतु माझ्या पापी स्वभावात#7:25 किंवा देहात मी पापाच्या नियमाचा दास आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in