1
1परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून, 2परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले 3आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.
4आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला:
परमेश्वर पिता आणि आपले तारणकर्ता ख्रिस्त येशू यांच्याकडून कृपा व शांती असो.
चांगल्या गोष्टींची आवड धरणार्या वडिलांची नेमणूक
5मी तुला क्रेता बेटावर सोडले, जेणे करून तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञेनुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे. 6जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी#1:6 किंवा विश्वासयोग्य असून त्यांच्यावर दुराचाराचा व ती अवज्ञा करणारी असल्याचा आरोप नसावा. 7अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत. 8ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे. 9त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.
खोट्या शिक्षकांचा प्रतिकार
10कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत. 11त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; कारण अप्रामाणिक लाभासाठी जे शिकवू नये ते शिकवून ते संपूर्ण घराण्यांची उलथापालथ करीत आहेत. 12त्यांच्याच कोणाएका संदेष्ट्याने सांगितले आहे, “क्रेतीय लोक लबाड, दुष्ट पशू, आळशी खादाड आहेत.” 13हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील, 14यहूदी काल्पनिक कथाकडे आणि सत्याकडे पाठ फिरविलेल्या लोकांच्या आज्ञाकडे दुर्लक्ष करतील. 15शुद्ध लोकांसाठी सर्वगोष्टी शुद्ध आहेत, तर भ्रष्ट आणि विश्वास नसलेल्या लोकांसाठी काहीही शुद्ध नाही. कारण त्यांचे मन आणि विवेकभाव हे दोन्ही अशुद्ध आहेत. 16ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.