योहान 7

7
येशू आणि त्याचे बंधू
1ह्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही.
2यहूद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता.
3म्हणून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “जी कामे तू करतोस ती तुझ्या शिष्यांनीही पाहावीत म्हणून तू येथून निघून यहूदीयात जा.
4जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही; तू ही कामे करत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.”
5कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.
6त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “माझा समय अजून आला नाही; तुमचा समय तर सर्वदा सिद्ध आहे.
7जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.
8तुम्ही वर सणाला जा; माझा समय अजून पूर्ण झाला नाही, म्हणून मी काही आताच ह्या सणास जात नाही.”
9असे त्यांना सांगून तो गालीलात राहिला.
10त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.
11तेव्हा यहूदी त्या सणात त्याचा शोध करत होते व म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?”
12लोकसमुदायांतही त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे;” कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांना फसवतो.”
13तरी यहूद्यांच्या भीतीमुळे त्याच्याविषयी कोणीही उघडपणे बोलला नाही.
आपण देवापासून आलो आहोत हे येशू यरुशलेमेत शिकवतो
14मग अर्धा सण आटोपल्यावर येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला.
15ह्यावरून यहूदी आश्‍चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून ह्याला विद्या कशी आली?”
16त्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठवले त्याची आहे.
17जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.
18जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
19मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले की नाही? तरी तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही. तुम्ही मला जिवे मारायला का पाहता?”
20लोकसमुदायाने उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे; तुला जिवे मारायला कोण पाहतो?”
21येशूने त्यांना उत्तर दिले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्‍चर्य करता.
22मोशेने तुम्हांला सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही तर पूर्वजांपासून आहे) व शब्बाथ दिवशी तुम्ही माणसांची सुंता करता.
23मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले ह्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?
24वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
25ह्यावरून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना?
26पाहा, तो उघडउघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकार्‍यांनी खरोखरच ओळखले आहे काय?
27तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.”
28ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरीपण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही.
29मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.”
30ह्यावरून ते त्याला धरण्यास पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.
31तेव्हा लोकसमुदायातील बर्‍याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?”
32लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले; आणि मुख्य याजक व परूशी ह्यांनी त्याला धरण्यास कामदार पाठवले.
33ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.
34तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”
35ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय?
36‘तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?”
जिवंत पाणी
37मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
38जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
39(ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)
40लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, “हा खरोखर तो संदेष्टा आहे.”
41कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय?
42‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?”
43ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली.
44त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरायला पाहत होते. तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.
45मग मुख्य याजक व परूशी ह्यांच्याकडे कामदार आले; त्यांना ते म्हणाले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”
46कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”
47त्यावरून परूशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहात काय?
48अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?
49पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”
50त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला,
51“एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”
52त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.”
व्यभिचारी स्त्री
53[मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले.

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió