उत्पत्ती 14

14
अब्राम लोटाची सुटका करतो
1त्या काळात जेव्हा शिनारचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा केदोरलाओमेर व गोयीमाचा राजा तिदाल यांनी, 2सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाहचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्याशी युद्ध केले. 3दुसर्‍या गटाचे सर्व राजे सिद्दिमाच्या म्हणजे (मृत समुद्राच्या खोर्‍यात) एकत्र जमले. 4बारा वर्षापर्यंत ते केदोरलाओमेर या राजाची सेवा करणारी प्रजा होते, परंतु तेराव्या वर्षी त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले.
5चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला 6आणि होरी लोकांच्या टोळीला सेईर डोंगरात मार देऊन रानाच्या हद्दीवर असलेल्या एल-पारान येथपर्यंत पिटाळून लावले. 7पुढे ज्याला कादेश असे नाव मिळाले, त्या एन मिशपात (अर्थात् कादेश) आणि अमालेकी लोकांचा, संपूर्ण प्रदेश व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी यांचाही त्यांनी पराभव केला.
8पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्‍यात हल्ला करण्याची तयारी केली. 9ते एलामाचा राजा केदोरलाओमेर, गोयीमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक यांच्याविरुद्ध लढले. ते पाच राजे विरुद्ध चार राजे असे लढले. 10सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले. 11चार राजांनी सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व अन्नसामुग्री लुटली आणि ते निघून गेले. 12सदोम येथे राहणारा अब्रामाचा पुतण्या लोट यालाही त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंसह ते घेऊन गेले.
13या लढाईत वाचलेला एक मनुष्य इब्री अब्रामाकडे पळून आला व त्याने ही बातमी त्याला सांगितली. त्यावेळी अब्राम, अमोरी मम्रे याच्या एला राईत तळ देऊन राहिला होता. अष्कोल व आनेर हे दोघे मम्रेचे भाऊ होते व त्यांनी अब्रामासोबत करार केला होता. 14लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्‍या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला. 15रात्रीच्या वेळी अब्रामाने युद्ध करण्यासाठी आपले सैन्य विभागले आणि त्याने या सैन्यावर यशस्वी हल्ला केला आणि त्याच्यापुढून पळून जाणार्‍या सैन्याचा त्याने दिमिष्काच्या उत्तरेकडे असलेल्या होबाह या शहरापर्यंत पाठलाग केला. 16त्याने सर्व मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट, याची मालमत्ता, स्त्रिया आणि कैद करून पळविलेले लोटचे इतर लोकही परत मिळविले.
17केदोरलाओमेर व त्याचे मित्र असलेल्या इतर राजांचा पराभव करून अब्राम परत चालला असताना सदोमचा राजा शावेहच्या खोर्‍यात (या खोर्‍यास पुढे राजांचे खोरे असे नाव पडले) त्याला भेटावयास आला.
18शालेमचा राजा मलकीसदेक जो परात्पर परमेश्वराचा याजक होता, तो अब्रामाला भाकर व द्राक्षारस घेऊन आला. 19आणि त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,
“आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ते
परात्पर परमेश्वराद्वारे अब्राम आशीर्वादित असो.
20ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले
ते परमेश्वर धन्यवादित असो.”
मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला.
21सदोमच्या राजाने अब्रामाला म्हटले, “लोक मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”
22यावर अब्रामाने सदोमाच्या राजाला उत्तर दिले, “आकाश व पृथ्वी यांना निर्माण करणारा परात्पर याहवेह परमेश्वर यांना मी हात उंच करून वचन दिले आहे, 23‘मी अब्रामाला श्रीमंत बनविले आहे,’ असे तुला कधीही म्हणता येऊ नये म्हणून मी तुझ्यापासून सुतळीचा एक दोरा किंवा जोड्याचा बंदही घेणार नाही. 24माझ्या या तरुण माणसांनी जेवढे अन्न खाल्ले आहे तेवढ्यांचाच मी स्वीकार करेन, मात्र माझे मित्र आनेर, अष्कोल आणि मम्रे यांना त्यांचा वाटा मिळो.”

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió