Logo YouVersion
Îcone de recherche

योहान 6

6
पाच हजार लोकांना जेवू घालणे
1ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला.
2तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती.
3येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला.
4यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
5तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?”
6हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत, हे त्याला ठाऊक होते.
7फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.”
8त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला,
9“येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?”
10येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले.
11येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले.
12ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.”
13मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
14तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”
येशूचा एकान्तवास व त्याचे पाण्यावरून चालणे
15मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
16संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले,
17आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला, तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता.
18आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता.
19मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले;
20परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”
21म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली; तेवढ्यात त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा किनार्‍यास लागला.
जीवनाची भाकर
22दुसर्‍या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते.
23तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते.
24तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यांत बसून येशूचा शोध करत कफर्णहूमास आले.
25तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरूजी, येथे कधी आलात?”
26येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता.
27नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”
28ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?”
29येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता?
31आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.”
32ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो.
33कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.”
34म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हांला नित्य द्या.”
35येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
36परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हांला सांगितले.
37पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.
38कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे;
39आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे.
40माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”
41‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,’ असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.
42ते म्हणाले, “ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना? तर मग, ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’ असे आता तो कसे म्हणतो?”
43येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही आपसांत कुरकुर करू नका.
44ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.
45संदेष्ट्यांच्या ग्रंथांत लिहिले आहे की, ‘ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.
46पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे.
47मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.
48मीच जीवनाची भाकर आहे.
49तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले.
50स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही.
51स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
52तेव्हा यहूदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?”
53ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही;
54जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.
55कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे.
56जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो.
57जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.
58स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय; तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही; ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.”
59कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.
संशय धरणारे शिष्य
60त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, “हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो?”
61आपले शिष्य ह्याविषयी कुरकुर करत आहेत हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय?
62मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर?
63आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.
64तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुमच्यामध्ये कित्येक आहेत.” कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपल्याला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते.
65मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.”
येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली
66ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत.
67म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?”
68शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत;
69आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात.”1
70येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान2 आहे.”
71हे तो शिमोन इस्कर्योत ह्याचा मुलगा यहूदा ह्याच्याविषयी बोलला, कारण तो बारा जणांपैकी एक असून त्याला धरून देणार होता.

Sélection en cours:

योहान 6: MARVBSI

Surbrillance

Partager

Copier

None

Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi

YouVersion utilise des cookies pour personnaliser votre expérience. En utilisant notre site Web, vous acceptez l'utilisation des cookies comme décrit dans notre Politique de confidentialité