Logo YouVersion
Îcone de recherche

मार्क 11

11
यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश
1ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की,
2“समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा.
3आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’
4तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले.
5तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, “शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात?”
6येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले; तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले.
7नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला.
8तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या.
9आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की,
“‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा
धन्यवाद असो;’
10आमचा बाप दावीद ह्याचे [प्रभूच्या नावाने]
येणारे राज्य धन्यवादित असो;
‘उर्ध्वलोकी होसान्ना.”’
11नंतर येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्वकाही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
अंजिराचे निष्फळ झाड
12दुसर्‍या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली.
13तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता.
14तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.
मंदिराचे शुद्धीकरण
15मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्‍यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्‍यांच्या बैठका उलथून टाकल्या;
16त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही.
17मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.”
18मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते.
19रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत.
विश्वासाचे सामर्थ्य
20मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले.
21तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.”
22येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
23मी तुम्हांला खचीत सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटून समुद्रात टाकला जा,’ असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
24म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.
25आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करावी.
26[परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.]”
येशूच्या अधिकाराविषयीचे प्रश्‍न
27मग ते पुन्हा यरुशलेमेस आले, आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,
28“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
29येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हांला सांगेन.
30योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसांपासून होता ह्याचे मला उत्तर द्या.”
31तेव्हा ते आपसांत विचार करू लागले : ‘स्वर्गापासून होता’ असे म्हणावे तर तो म्हणेल की, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
32‘माणसांपासून होता’ असे म्हणावे तर? - त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत.
33तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.”

Sélection en cours:

मार्क 11: MARVBSI

Surbrillance

Partager

Copier

None

Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi