प्रेषित 20

20
मासेदोनिया, ग्रीस व त्रोवास येथे पौल
1जेव्हा गडबड शांत झाली, तेव्हा पौलाने शिष्यांना बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर, त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जाण्यास निघाला. 2त्या भागातून प्रवास करून त्याने लोकांना अनेक उत्तेजनपर शब्द सांगितले आणि शेवटी तो ग्रीसमध्ये आला, 3तिथे तो तीन महिने राहिला. पुढे सीरियाला जलमार्गाने जाण्याची तो तयारी करीत असताना, यहूदी कट कारस्थान करीत आहेत, हे त्याच्या नजरेस आले, तेव्हा मासेदोनियामधून जाण्याचे त्याने ठरविले. 4त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते. 5ते पुढे जाऊन त्रोवास येथे आमची वाट पाहत होते. 6परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला.
त्रोवास येथे युतुखला मेलेल्यातून उठविले जाते
7आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्‍या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला. 8वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमलो होतो, तिथे पुष्कळ दिव्यांचा प्रकाश होता. 9तेव्हा पौल बोलत राहिल्यामुळे युतुख नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता, त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तो गाढ झोपेत असताना, तिसर्‍या मजल्यावरून खाली जमिनीवर पडला आणि त्यास उचलले तेव्हा तो मरण पावला आहे असे दिसून आले. 10तेव्हा पौल खाली गेला आणि त्या तरुणावर पाखर घालून आपल्या हाताने कवटाळले व म्हणाला, “भयभीत होऊ नका, तो जिवंत आहे!” 11मग तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाकर मोडून खाल्ली. पहाट होईपर्यंत बोलत राहिल्यावर तो रवाना झाला. 12लोक त्या तरुणाला जिवंत घरी घेऊन आले म्हणून त्यांना अतिशय समाधान वाटले.
इफिस येथील वडीलजनांना निरोप
13पौल अस्सोस नगराकडे पायी जाणार होता म्हणून त्याने असे ठरविले की, आम्ही तारवात बसून अस्सोसला पुढे जावे आणि तिथे पोहोचल्यावर त्याला तारवात घ्यावे. 14त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो. 15दुसर्‍या दिवशी तारवात बसून आम्ही खियोस बंदर पार केले. त्यानंतरच्या पुढील दिवशी सामोस बंदर पार केले, मग दुसर्‍या दिवशी मिलेतास आलो. 16आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस शहराच्या पुढे जाण्याचे पौलाने ठरविले होते, कारण शक्य झाल्यास पेन्टेकॉस्टच्या दिवसांच्या वेळी यरुशलेममध्ये पोहोचावे, या दृष्टीने तो घाई करीत होता.
17मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला. 18ते आल्यानंतर त्याने त्यांना म्हटले, “मी आशियात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्णवेळ तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो व कसा राहिलो, याची तुम्हाला जाणीव आहे. 19म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि माझ्या यहूदीयांच्या कटांमुळे मजवर आलेली अतिशय कठीण परीक्षा व संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला माहीत आहे. 20जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले. 21त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे.
22“आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही. 23मला माहीत आहे की प्रत्येक शहरामध्ये तुरुंगवास व यातना यांना मला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा पवित्र आत्मा मला देत आहे. 24तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.
25“आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही. 26यास्तव, मी आज तुम्हाला जाहीर करतो की तुमच्यापैकी कोणाच्याही रक्ताबाबत मी निर्दोष आहे. 27कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. 28तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या#20:28 किंवा प्रभूच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा. 29मला हे माहीत आहे की मी गेल्यानंतर, क्रूर लांडगे येतील व तुम्हामध्ये शिरतील आणि ते कळपालाही सोडणार नाहीत. 30प्रत्यक्ष तुमच्या गटामधून काही माणसे उठतील व त्यांना अनुयायी मिळावेत व त्यांचे शिष्य व्हावेत म्हणून सत्य विपरीत करतील. 31म्हणून आता तुम्ही सावध राहा! मी तुमच्याबरोबर तीन वर्षे रात्रंदिवस आसवे गाळून तुम्हा प्रत्येकाला सावध राहण्याविषयी सूचना देण्याचे केव्हाही थांबविले नाही, याची आठवण ठेवा.
32“आणि आता मी तुम्हाला परमेश्वरावर व त्यांच्या कृपेच्या वचनांवर सोपवितो, ते वचन तुमची वृद्धी करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्वांमध्ये वतन द्यावयास समर्थ आहे. 33मी कोणाच्याही सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. 34तुम्हा स्वतःस माहीत आहे की माझ्या या हातांनी माझ्या गरजा आणि माझ्याबरोबर असणार्‍यांच्याही गरजा भागविण्यासाठी कष्ट केले आहेत. 35मी केलेल्या सर्व गोष्टीत मी तुम्हाला निदर्शनास आणून दिले आहे की, अशाप्रकारे श्रम करून आपण अशक्तांना साहाय्य करावे व प्रभू येशू जे शब्द स्वतः बोलले होते ते स्मरणात ठेवा: ‘घेण्यापेक्षा देणे यात अधिक धन्यता आहे.’ ”
36पौलाचे बोलणे संपल्यावर त्याने सर्वांबरोबर गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. 37तेव्हा त्या सर्वांनी फार मोठा आकांत केला व त्यांनी पौलाच्या गळ्यात मिठी मारून त्याची चुंबने घेतली. 38तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही हे जे वाक्य त्याने म्हटले होते, याचे त्या सर्वात जास्त दुःख झाले होते. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचविले.

Jelenleg kiválasztva:

प्रेषित 20: MRCV

Kiemelés

Megosztás

Másolás

None

Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be