उत्पत्ती 11

11
बाबिलोन येथील बुरूज
1त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती. 2पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार#11:2 किंवा बाबिलोन प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.
3ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले. 4मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”
5परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले, 6तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही. 7चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
8अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. 9म्हणून त्या शहराला बाबिलोन#11:9 किंवा बाबिलोन अर्थात् गोंधळ म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
शेम ते अब्राम
10शेमाची वंशावळी:
अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता. 11अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
12अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला. 13शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
14जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला. 15आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
16एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता. 17पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
18पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता. 19रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
20रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता. 21सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
22सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता. 23नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
24नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला. 25तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
26तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.
अब्रामाचे गोत्र
27तेरहाच्या वंशजाचा तपशील:
तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला. 28पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला. 29अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता. 30सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.
31मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.
32तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.

Արդեն Ընտրված.

उत्पत्ती 11: MRCV

Ընդգծել

Կիսվել

Պատճենել

None

Ցանկանու՞մ եք պահպանել ձեր նշումները ձեր բոլոր սարքերում: Գրանցվեք կամ մուտք գործեք