उत्प. 18

18
वचनपुत्र
इब्री. 13:2
1परमेश्वराने मम्रेच्या एलोन झाडांजवळ अब्राहामाला दर्शन दिले, तेव्हा तो दुपारच्या उन्हाच्या वेळी तंबूच्या दाराशी बसला होता. 2त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. अब्राहामाने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले. 3तो म्हणाला, “प्रभू, जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुझ्या सेवकाला सोडून पुढे जाऊ नका. 4थोडे पाणी आणू द्या, तुमचे पाय धुवा, आणि तुम्ही झाडा खाली आराम करा. 5मी तुमच्यासाठी थोडे अन्न आणतो, जेणेकरून तुम्हास ताजेतवाने वाटेल. मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा, यासाठीच तुमच्या या सेवकाकडे तुमचे येणे झाले असावे.” आणि ते म्हणाले, “तू म्हणतोस तसे कर.” 6अब्राहाम पटकन तंबूत सारेकडे गेला आणि म्हणाला, “लवकर #साधारण एकवीस किलोतीन मापे सपीठ घेऊन ते मळ आणि भाकरी कर.” 7नंतर अब्राहाम गुरांच्या कळपाकडे पळत गेला आणि त्यातून त्याने कोवळे आणि चांगले वासरू घेतले आणि सेवकाजवळ देऊन त्याने त्यास ते लवकर तयार करण्यास सांगितले. 8त्याने तयार केलेले वासरू, तसेच दूध व लोणी त्यांच्यापुढे खाण्यासाठी ठेवले आणि ते जेवत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला. 9ते त्यास म्हणाले, “तुझी पत्नी सारा कोठे आहे?” त्याने उत्तर दिले, “तेथे ती तंबूत आहे.” 10त्यांच्यातील एक म्हणाला, “मी वसंतऋतूच्या वेळी तुझ्याकडे नक्की परत येईन, आणि पाहा तेव्हा तुझी पत्नी सारा हिला मुलगा होईल.” तेव्हा त्याच्यामागे असलेल्या तंबूच्या दारामागून सारेने हे ऐकले. 11आता अब्राहाम व सारा म्हातारे झाले होते, त्यांचे वय बरेच झाले होते, आणि स्त्रीला ज्या वयात मुले होऊ शकतात, ते साराचे वय निघून गेले होते. 12म्हणून सारा स्वतःशीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा पतीही म्हातारा झाला आहे, आता मला ते सुख लाभेल काय?” 13परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता इतकी म्हातारी झाली असताना मला मुलगा होईल काय, असे ती का म्हणाली? 14परमेश्वरास काही अशक्य आहे काय? येत्या वसंतऋमध्ये, सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन. पुढील वर्षी साधारण याच वेळी सारा हिला मुलगा होईल.” 15नंतर सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही,” कारण ती फार घाबरली होती. त्याने उत्तर दिले, “नाही, तू हसलीसच.”
सदोम नगरासाठी अब्राहामाची मध्यस्थी
16नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे जाण्यास निघाले. अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर गेला. 17परमेश्वर देव म्हणाला, “मी जे काही करणार आहे ते अब्राहामापासून लपवू काय? 18कारण अब्राहामापासून खरोखर एक महान व समर्थ राष्ट्र होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील. 19मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.” 20मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा यांच्या दुष्टाईचा आक्रोश मोठा आहे, आणि त्यांचे पाप फार गंभीर असल्या कारणाने, 21मी आता तेथे खाली जाईन आणि त्यांच्या पातकाचा जो बोभाटा माझ्या कानी आला आहे त्याप्रमाणेच त्यांची करणी आहे का हे पाहीन. तसे नसेल तर मला समजेल.” 22मग ती माणसे तेथून वळून आणि सदोम नगराकडे गेली, परंतु अब्राहाम परमेश्वरापुढे तसाच उभा राहिला. 23मग अब्राहाम परमेश्वराजवळ जाऊन म्हणाला, “तू दुष्टाबरोबर नीतिमानांचाही नाश करशील काय? 24कदाचित त्या नगरात पन्नास नीतिमान लोक असतील तर त्या नगराचा तू नाश करणार काय? तू त्या नगरात राहणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करणार नाहीस काय? 25असे करणे तुझ्यापासून दूर असो. दुष्टाबरोबर नीतिमानाला मारणे म्हणजे नीतिमानाला दुष्टासारखे वागवणे हे तुझ्यापासून दूर असो! जो तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तो तू योग्य न्याय करणार नाहीस काय?” 26परमेश्वर म्हणाला, “या सदोम शहरात मला पन्नास नीतिमान लोक सापडले तरीही त्यांच्यासाठी मी संपूर्ण स्थळाचा बचाव करीन.” 27अब्राहामाने उत्तर देऊन म्हटले, “पाहा मी केवळ धूळ व राख आहे, तरी प्रभूजवळ बोलायला धजतो! 28समजा जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरता तू सर्व नगराचा नाश करशील काय?” आणि तो म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” 29पुन्हा तो परमेश्वरास म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तरीही, मी शहराचा नाश करणार नाही.” 30तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.” 31तो म्हणाला, “मी प्रभूशी बोलायला धजतो! समजा तेथे कदचित वीसच मिळाले तर?” परमेश्वराने उत्तर दिले, “त्या वीसांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 32शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.” 33मग परमेश्वराने अब्राहामाशी बोलणे संपविल्याबरोबर तो लगेच निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत आला.

선택된 구절:

उत्प. 18: IRVMar

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요