मत्तय 11

11
बाप्तिस्मा देणारा योहान
1एकदा असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आदेश देण्याचे काम पुरे केले आणि तो तेथून त्यांच्या नगरांत प्रबोधन करायला व शुभवर्तमानाची घोषणा करायला निघाला.
2योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या काही शिष्यांना पाठवून त्याला विचारले, 3“जो येणार आहे, तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
4येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानला जाऊन सांगा: 5आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते. 6जो कोणी माझ्यासंबंधी शंका बाळगत नाही, तो धन्य.”
7योहानचे शिष्य परत गेल्यावर येशू लोकसमुदायाबरोबर योहानविषयी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालविलेला बोरू काय? 8काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. 9तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, खरेच संदेष्ट्याला. परंतु तुम्ही संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला पाहिले. 10‘पाहा, मी माझ्या निरोप्याला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तो हाच आहे. 11मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी झाला नाही. मात्र स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहूनही श्रेष्ठ आहे. 12बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्या दिवसांपासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. 13योहान येईपर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी हा संदेश दिला 14आणि त्यांचा संदेश स्वीकारण्याची तुमची इच्छा असेल, तर जो एलिया येणार, तो हाच आहे. 15ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!
16ह्या पिढीची तुलना मी कशाशी करू? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात, 17‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला, तरी तुम्ही नाचला नाहीत; आम्ही शोकगीते गायिली तरी तुम्ही रडला नाहीत.’ 18कारण योहान उपवास करत असे व मद्य पीत नसे, तेव्हा ‘त्याला भूत लागले आहे’, असे लोक म्हणत असत. 19मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी लोक म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य. जकातदारांचा व पापी लोकांचा मित्र!’ परंतु परमेश्वराची सुज्ञता त्याच्या कृत्यांवरून सिद्ध होते.”
पश्चात्तापाची आवश्यकता
20ज्या ज्या नगरांमध्ये येशूने पुष्कळ चमत्कार केले होते, तेथील लोकांनी पश्‍चात्ताप केला नाही म्हणून त्याने त्यांना दोष दिला. 21“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही जे चमत्कार घडलेले पाहिले ते सोर व सिदोन यांनी पाहिले असते, तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्चात्ताप केला असता. 22परंतु मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन ह्यांना तुमच्यापेक्षा आधिक दया दाखवली जाईल 23आणि हे कफर्णहूमा, तुला आकाशापर्यंत चढवले जाईल काय? तुला नरकात फेकले जाईल! तू जे चमत्कार पाहिले ते सिदोनात घडले असते, तर ते नगर आजपर्यंत राहिले असते. 24मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी सिदोन नगरातील लोकांना तुमच्यापेक्षा अधिक सुसह्य होईल!”
बालकांसारखी मनोवृत्ती
25एकदा येशूने अशी प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना उघड करून दाखवल्या आहेत. 26होय, पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.
येशूचे आमंत्रण
27माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
28अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. 29मी मनाचा सौम्य व लीन आहे. माझे जू आपल्यावर घ्या व माझ्याकडून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल; 30कारण माझे जू सोपे व माझे ओझे हलके आहे.”

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요