मत्तय 6

6
गुप्त धर्माचरण
1माणसांना दिसावे म्हणून त्यांच्यापुढे तुमचे धर्माचरण न करण्याची तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला पारितोषिक मिळणार नाही.
गुप्त दानधर्म
2जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे प्रार्थनामंदिरात व रस्त्यांवर लोकांपुढे स्तोम माजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. 3उलट, तू जेव्हा दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस. 4तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.
गुप्त प्रार्थना
5तसेच जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा ढोंग्यांसारखा वागू नकोस. लोकांनी त्यांना पाहावे म्हणून सभास्थानांत व चव्हाट्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. 6उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.
7तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले ऐकले जाईल, असे त्यांना वाटते. 8तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत, हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणतो.
प्रभूने शिकवलेली प्रार्थना
9तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा:
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
10तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
11आमची रोजची भाकर आज आम्हांला दे
12आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आम्हांला आमच्या अपराधांची क्षमा कर
13आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेनर्.]
14जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा केली तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हांलाही क्षमा करील. 15परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
गुप्त उपवास
16तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखा तुमचा चेहरा खिन्न करू नका, कारण आपण उपवास करत आहोत, असे लोकांना दिसावे म्हणून ते मलूल चेहऱ्याने वावरतात. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, त्यांना त्यांचे पारितोषिक मिळाले आहे. 17उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. 18अशासाठी की, तू उपवास करत आहेस, हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे. म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.
खरी संपत्ती
19पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. 21अर्थात, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
प्रकाश आणि अंधार
22डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; 23पण तुझी दृष्टी सदोष असेल तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तुझ्यातील प्रकाश जर अंधकारमय झाला तर तो अंधार किती भयंकर असेल!
24कोणीही मनुष्य दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची सेवा करू शकणार नाही.
चिंता आणि देवावर भिस्त
25म्हणूनच मी तुम्हांला सांगतो, तुमच्या जीवनाविषयी, म्हणजे तुम्ही काय खावे व काय प्यावे आणि तुमच्या शरीराविषयी, म्हणजे तुम्ही काय परिधान करावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीवन आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक मौल्यवान आहे किंवा नाही? 26आकाशातील पक्ष्यांकडे पाहा; ते पेरणी करत नाहीत; कापणी करत नाहीत की कोठारांत धान्य साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाहीत? 27चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?
28तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत. 29तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता! 30जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो तर तुम्ही अल्पविश्‍वासी लोकहो, तो तुम्हांला अधिक कपडे पुरवणार नाही काय?
31म्हणून काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका. 32ह्या सर्व गोष्टी मिळवायची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गातील पिता जाणून आहे. 33तर मग तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यासाठी झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्या सर्व गोष्टीदेखील तुम्हांला मिळतील. 34म्हणून उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्या. आजचे दुःख आजच्यासाठी पुरे!

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요