मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.”
माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले, व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली.