YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 2

2
हन्नाचे गीत
1हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.
2परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही;
3गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.
4शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत; जे लटपटत होते त्यांच्या कंबरेस बलरूप कमरबंद चढवला आहे.
5जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. जे क्षुधित होते त्यांना आता आराम प्राप्त झाला आहे; वंध्येला सात मुले झाली आहेत; बहुपुत्रवती क्षीण झाली आहे.
6परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राणदानही करतो; तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो.
7परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो; तो अवनत करतो व उन्नतही करतो.
8तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.
9तो आपल्या भक्तांची पावले सांभाळील. पण दुष्ट अंधारात स्तब्ध पडून राहतील; कारण कोणीही मानव आपल्याच बलाने विजयी होणार नाही.
10परमेश्वराशी झगडणार्‍यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”
11नंतर एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य 12एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.
13लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई,
14आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्राएल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत.
15वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणार्‍याला म्हणत असे, “भाजण्यासाठी याजकाला मांस दे, तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही, तर कच्चेच घेईल.”
16“पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे,” असे जर यज्ञकर्ता त्याला म्हणाला तर तो म्हणे, “नाही, आता दे, नाहीतर मी जबरीने घेईन.”
17हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला.
18शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.
19त्याची आई त्याच्यासाठी एक लहानसा झगा तयार करी आणि दर वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करायला येई त्या वेळी त्याला तो देत असे.
20एलीने एलकाना व त्याची स्त्री ह्यांना असा आशीर्वाद दिला की, “तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला त्याबद्दल परमेश्वर तुला ह्या स्त्रीपासून संतती देवो.” मग ती उभयता आपल्या घरी गेली;
21आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला तीन पुत्र व दोन कन्या झाल्या. इकडे शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.
22एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.
23तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत.
24माझ्या मुलांनो, असे करू नका; माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही; तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात.
25कोणा मनुष्याने दुसर्‍या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील?” तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.
26इकडे शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.
27मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिसरात फारोच्या घरी दास्य करीत होते तेव्हा त्याला मी प्रकट झालो होतो की नाही?
28तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावेत, धूप जाळावा आणि माझ्यासमोर एफोद ल्यावे म्हणून इस्राएलाच्या सर्व वंशांतून त्याला मी निवडून नेमले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्राएल लोकांची सर्व हव्ये मी दिली की नाही?
29माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?
30ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.
31पाहा, मी तुझा बाहू व तुझ्या पितृकुळाचा बाहू उच्छेदीन व तुझ्या घरी कोणीही वृद्ध माणूस सापडायचा नाही, असे दिवस येत आहेत.
32देवाने इस्राएल लोकांचा कितीही उत्कर्ष केला तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील; तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही.
33तुझे डोळे क्षीण होतील व तुझे मन शोकाकुल होईल; तरीपण तुझ्या कुळातील सर्वच पुरुषांचा उच्छेद करून त्यांना मी आपल्या वेदीपासून दूर करणार नाही; तुझ्या घरी उत्पन्न होतील तेवढे पुरुष भरज्वानीत मरतील.
34तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास ह्यांच्यावर अरिष्ट येईल, हाच तुला इशारा होईल, ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील;
35आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन; तो माझ्या अंतःकरणात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करील; मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर चालेल.
36तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवलीपावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच्याकडे जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणतेतरी काम मला द्या म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.”

सध्या निवडलेले:

१ शमुवेल 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन